गुढीपाडवा साजरा करू न देण्याचा हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्टे यांचा फसवा प्रयत्न !

हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी (धाकटे मालक) छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या क्रूरकर्मा औरंगजेबाने अत्यंत हाल हाल करून फाल्गुन अमावास्येच्या रात्री केली. याविषयीचे सविस्तर पुरावेे इतिहासकारांनी त्या वेळीच मांडले होते. गेल्या काही वर्षांपासून मात्र काही जात्यंध शक्ती समाजात दुही माजवण्याच्या उद्देशाने गुढीपाडवा जवळ आला की, ‘छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार केली’, असा विखारी प्रचार करतांना आढळतात. सामाजिक माध्यमांतून तसे लिखाण प्रसारित केले जाते. ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालेले हे महाभाग वर्षभर छत्रपती संभाजी महाराजांचे नावही घेत नाहीत; मात्र गुढीपाडवा जवळ आला की, ‘हा सण संभाजी महाराजांच्या हत्येच्या निमित्ताने ब्राह्मणांनी साजरा करण्यास आरंभ केला’, असे ढोल बडवून सांगू लागतात. रावणाचा वध करून प्रभु श्रीराम वनवासातून परतल्याचा आनंद गुढ्या उभारून साजरा केल्याचा इतिहास आहे. आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात पूर्वीपासून गुढ्या उभारत असल्याचा उल्लेख शिवकालीन इतिहासातच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वकाळातील उपलब्ध पत्रव्यवहार, संतांचे अभंग आणि इतिहासकालीन दाखले यांतून आढळतो.

१. गुढीपाडव्याचे ऐतिहासिक पुरावे

श्री. जगन घाणेकर

इतिहासाचार्य वि.के. राजवाडे यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’, या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आहेत, ज्यामध्ये इतिहासकालीन विविध पत्रे आणि कागदपत्रे संग्रहित आहेत. त्यातील एका पत्रात ‘गुढीपाडवा’ या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो.

या पत्रात असा उल्लेख आहे, ‘गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते.’ हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नरला लिहिले आहे. हे निराजी पंडित, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते. यावरून हे स्पष्ट होते की, छत्रपती शिवरायांच्या काळातही गुढीपाडवा सण साजरा केला जात असे.

२. गुढीविषयी संतांच्या लिखाणातील संदर्भ आपल्या संतांनीही गुढीचा उल्लेख अनेक ओव्या आणि अभंग यांतून केला आहे.

अ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली ‘ज्ञानेश्‍वरी’तील अध्याय क्रमांक ४ ओवी क्रमांक ५२ मध्ये लिहितात, ‘अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥’ (अर्थ : भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारतो.) ‘ज्ञानेश्‍वरी’तील अध्याय क्रमांक ६ ओवी क्रमांक ५२ मध्ये पुढील ओळी आढळतात, ‘ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥’ (अर्थ : भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ऐक, जो संन्यासी आहे तोच योगी आहे, अशा दोन्ही मार्गांची एकवाक्यता असल्याची ध्वजा अनेक शास्त्रांनी या जगात उभारली आहे.)

आ. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘फेडावया देवांची सांकडी । स्वधर्म वाढवावया वाढी । नामे मोक्षाची उभवावया गुढी । सूर्यवंशा गाढी दशा आली ॥’ (भावार्थरामायण, बालकांड, अध्याय १, श्‍लोक ४३)  (अर्थ : देवांचे गार्‍हाणे सोडवण्यासाठी, स्वधर्माच्या पुनरुत्थानासाठी, मोक्षाची ध्वजा उभारण्यासाठी मी ‘राम’ रूपाने या सूर्यवंशामध्ये अवतरित होईन.)

इ. शिवकालीन खंडात होऊन केलेले जगद्गुरु संत तुकाराम महाराज गुढीचे वर्णन करतांना म्हणतात, ‘ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती । गुढीया उभविती घरोघरी ॥’ (अर्थ : श्रीकृष्णाच्या आगमनाने आनंदीत झालेले गोकुळवासी ब्रह्मानंदात नाचू लागले आणि घरोघरी गुढ्या उभारू लागले.) एके ठिकाणी संत तुकाराम महाराज लिहितात, ‘गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा । बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी । गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे । तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे ॥’ (अर्थ : नंदाघरी बाळकृष्णाचे आगमन झाल्यामुळे गोकुळवासी नरनारींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या आनंदात ते घरांवर गुढ्या तोरणे उभारून श्रीकृष्णाच्या कथा आणि गाणी गात आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांनी गोविंदाचे दर्शन घेतले त्यांना त्याचाच छंद लागला.)

ई. संत चोखामेळा यांचा पुढील अभंग तर सर्वश्रुत आहे, ‘टाळी वाजवावी । गुढी उभारावी । वाट हे चालावी । पंढरीची ॥’

३. प्रखर धर्माभिमान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज !

या संदर्भात संशोधनच करायचे म्हटले, तर शेकडो पुरावे सापडतील. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा संबंध गुढीपाडवा या प्राचीन सणाशी जोडण्याचा जात्यंध शक्तींचा अपप्रचार केवळ सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठीच असल्याचे स्पष्ट होते. क्रूरकर्मा औरंगजेब हा अत्यंत निष्ठुर आणि धर्मांध होता. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून १ मास औरंगजेबाने त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. धर्मांतर करण्यास दबाव आणला; पण शंभूराजांनी छळ होऊनही प्राण त्यागणे पसंत केले; मात्र हिंदु धर्म त्यागला नाही !

४. हिंदूंनी त्यांचा सर्वांत मोठा सण साजरा न करण्यासाठी औरंगजेबाने केली छत्रपती शंभूराजांची हत्या !

छत्रपती शंभूराजांची धर्मनिष्ठा औरंग्याच्या जिव्हारी खुपली. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा हिंदूंंचा सर्वांत मोठा सण. हिंदूंचा नववर्षारंभ. ‘हा सण हिंदूंंनी साजरा करू नये’, म्हणूनच फाल्गुन अमावास्येला त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. औरंग्याचा तोच डाव यशस्वी करण्याचा दुर्दैवी प्रयत्न आज काही हिंदुद्वेषी मंडळी करत आहेत.

५. शास्त्रोक्तरित्या गुढी उभारा !

भगवे ध्वज ही स्वराज्याची पताका, तसेच हिंदु धर्माचे प्रतीक असल्याने ते घरावर अवश्य लावावेत; मात्र केवळ एक दिवसासाठी नव्हे, तर ते कायमस्वरूपी घरावर लावावेत. गुढीपाडव्याला मात्र हिंदु नववर्षाचे स्वागत शास्त्रोक्तरित्या दारासमोर गुढी उभारूनच करावे !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई. (२.४.२०२४)