१. पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी साधिकेला होणार्या शारीरिक त्रासांवर उपाय म्हणून परात्पर गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलण्यास अन् त्यांना आत्मनिवेदन करण्यास सांगणे
‘फेब्रुवारी २०२३ या मासात मला काही शारीरिक त्रास अधिक प्रमाणात होत होते. त्यामुळे माझी मानसिक स्थितीही चांगली नव्हती. मी पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत) यांना भ्रमणभाष करून मला होणारे शारीरिक त्रास आणि त्यामुळे बिघडलेली माझी मनःस्थितीही सांगितली. पू. (सौ.) मनीषाताईंनी मला काही आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगितले आणि त्या म्हणाल्या, ‘‘तू सूक्ष्मातून प.पू. गुरुमाऊलींशी दिवसभरात अधिकाधिक बोल आणि त्यांना आत्मनिवेदन कर.’’
२. संतांचे आज्ञापालन केल्यास पुष्कळ लाभ होत असल्याचे लक्षात येणे
त्या दिवसापासून माझा प.पू. गुरुदेवांशी नियमित बोलण्याचा प्रयत्न वाढला. ‘मला आलेल्या अडचणी आणि त्रास, माझ्या मनाची स्थिती, तसेच माझ्याकडून झालेले चांगले प्रयत्न मी प्रतिदिन सूक्ष्मातून गुरुदेवांना आत्मनिवेदन करून सांगत होते. यामुळे माझ्या अडचणी सुटणे, मनाची स्थिती पालटून सकारात्मकता वाढणे, सेवेत पुष्कळ आनंद मिळणे इत्यादी गोष्टी मला अनुभवता येऊ लागल्या. मला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्वही सतत अनुभवता येऊ लागले.‘संत जेव्हा आपल्याला साधनेच्या संदर्भात काही सांगतात, तेव्हा त्यांच्या वाणीतून निघालेले शब्दरूपी चैतन्य आपल्यासाठी कार्यरत झालेले असते आणि आज्ञापालन केल्यामुळे आपल्याला त्याचा पुष्कळ लाभ होतो’, हे मला शिकायला मिळाले.
३. पू. (सौ.) मनीषाताई यांनी दिलेल्या प्रसादाच्या रिकाम्या पिशवीत ठेवलेली औषधे ‘पू. ताईंचा प्रसाद आहे’, या भावाने ग्रहण केल्याने त्रास न्यून होणे
माझ्या शारीरिक त्रासांवर काही वैद्यकीय उपचार चालू होते. ती औषधे घेतल्यावर औषधांच्या दुष्परिणामांचा (साईड इफेक्टचा) मला पुष्कळ त्रास होत होता, उदा. तीव्र डोकेदुखी, डोक्यावर वजनदार वस्तू ठेवल्याप्रमाणे जड वाटणे, डोळ्यांना अंधुक दिसणे, तीव्र बद्धकोष्ठता इत्यादी. एप्रिल २०२३ मध्ये माझी पुन्हा पू. (सौ.) मनीषाताईंशी भेट झाली. तेव्हा त्यांनी मला प्लास्टिकच्या पिशवीत प्रसाद दिला होता. तो प्रसाद संपल्यावर मी ती रिकामी प्लास्टिकची पिशवी आध्यात्मिक लाभांसाठी ठेवली. जुलै २०२३ मध्ये मला पुन्हा ती औषधे घ्यावी लागली. तेव्हा मी ती औषधे पू. ताईंनी दिलेल्या प्रसादाच्या रिकाम्या पिशवीमध्ये ठेवली आणि ‘ती औषधे म्हणजे पू. ताईंचा प्रसाद आहे’, या भावाने मी ती ग्रहण करत असे. त्यामुळे मला औषधांचा त्रास झाला नाही.
४. वैद्यकीय प्रक्रियेनंतर बाहेर पडणे शक्य नसल्याने स्वतःच इंजेक्शन्स घेण्याची पद्धत शिकून घेणे आणि पू. (सौ.) मनीषाताईंना दिलेल्या प्रसादाच्या रिकाम्या पिशवीत इंजेक्शन्स ठेवणेे
मला काही दिवस मांडीत ‘इंजेक्शन्स’ घ्यावी लागत होती. प्रारंभी मी दवाखान्यात जाऊन ती घेत होते. माझी एक वैद्यकीय प्रक्रिया झाल्यानंतरही मला पुढे ७ इंजेक्शन्स घ्यायची होती. ती इंजेक्शन्स घेतल्यावर मला त्या जागी त्वचेखाली गाठ यायची आणि मोठा काळानिळा डाग पडून मांडी अतिशय दुखायची. कधी कधी मला उभे रहाणे किंवा बसणेही शक्य नसायचे. त्यामुळे मला बाहेर पडणेही शक्य होत नव्हते. तेव्हा मी ती इंजेक्शन्स घेण्याची पद्धत परिचारिकेकडून शिकून घेतली आणि नंतरची सर्व इंजेक्शन्स घरी आणून प्रसादाच्या पिशवीत ठेवली. त्याचा मला पुष्कळ लाभ झाला. मी ते इंजेक्शन घेण्यापूर्वी प.पू. गुरुदेवांचे भावपूर्ण स्मरण करून स्वतः इंजेक्शन घेत होते. त्यामुळे मला त्याचा पूर्वीप्रमाणे कोणताच दुष्परिणाम झाला नाही.
५. शारीरिक त्रास होत असतांना पू. (सौ.) मनीषाताईंचा साधनाप्रवास आठवल्याने मन सकारात्मक होणे आणि भावपूर्ण सेवा होऊन पुष्कळ आनंद मिळणे
मला शारीरिक त्रास होऊ लागले की, मला पू. (सौ.) मनीषाताईंच्या साधनाप्रवासातील काही प्रसंग आठवतात. तेव्हा मनामध्ये ‘मी त्यांच्यापेक्षा पुष्कळ चांगल्या स्थितीत आहे. ‘पू. ताईंनी रुग्णाईत अवस्थेतही सेवा आणि साधना कशी केली असेल ?’, हे आठवून माझे मन पुष्कळ सकारात्मक होते. सेवा करतांना माझी भावजागृती होऊन सेवा भावपूर्ण करता येते आणि सेवेतून पुष्कळ आनंद मिळतो.
६. प्रार्थना
प.पू. गुरुमाऊली, माझी कोणतीही पात्रता नसतांना पू. ताईंच्या माध्यमातून तुमची अखंड कृपा माझ्यावर होत आहे. यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘मला सदैव तुमच्या चरणांशी रहाता येऊ दे आणि केवळ गुरुचरणप्राप्तीचाच ध्यास लागू दे’, अशी आपल्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’
– सौ. अर्चना आशीष पाटील, वल्लभनगर, चिंचवड, पुणे. (८.८.२०२३)
|