S Jaishankar To UN : आम्हाला निवडणुका कशा घ्याव्यात ?, हे सांगण्यासाठी कोणत्याही जागतिक संस्थेची आवश्यकता नाही !

भारतातील निवडणुकांवर विधान करणार्‍या संयुक्त राष्ट्रांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुनावले !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – भारतात निवडणुका कशा घ्याव्यात, हे सांगण्यासाठी कोणत्याही जागतिक संस्थेची आवश्यकता नाही. माझ्यासोबत भारतातील जनता आहे. भारतातील जनता निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष होतील, याची खात्री देईल. त्याची काळजी नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांना सुनावले.

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी २९ मार्च या दिवशी म्हटले होते, ‘आम्हाला आशा आहे की, भारतात प्रत्येकाच्या अधिकारांचे रक्षण केले जाईल. सध्या भारतात निवडणुकीची वेळ आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना निकोप वातावरणात मतदान करण्याची संधी मिळाली पाहिजे.’ पत्रकार परिषदेत दुजारिक यांना देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर भारतात निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देतांना स्टीफन यांनी निष्पक्ष निवडणुका घेण्याबाबत म्हटले होते.