करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तींची वारंवार रासायनिक संवर्धन करूनही पुन्हा एकदा झीज !

संवर्धन प्रक्रियेकरता वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने तडे गेल्याचे तज्ञांचे अनुमान

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या मुखाच्या उजवीकडील भागावर नाकापासून गालापर्यंत गेलेला तडा आणि झालेली झीज

कोल्हापूर – पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर्.एस्. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी केलेला अहवाल ४ एप्रिल २०२४ या दिवशी न्यायालयात सादर झाला. ८ पानांच्या या अहवालात त्यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी अर्थात् अंबाबाईच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून ती झीज वर्ष २०१५ या वर्षी झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे, असे म्हटले आहे. त्याचसह देवीचे नाक, ओठ, हनुवटी या सगळ्यांवर तडे गेले असून ते तडे वर्ष २०१५ मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनाच्या वापरल्या गेलेल्या साहित्याला गेलेले आहेत. तरी मूर्तीचा चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. या संवर्धन प्रक्रियेकरता वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याला तडे जाऊन थर निघत असल्याचे अनुमान तज्ञांनी काढले आहे. त्याचसह अन्य ठिकाणच्या लेपालाही तडे गेल्याचे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे.

येथील करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्ती संवर्धनाच्या संबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्यासमोर चालू आहे.

या दाव्यामध्ये वादी गजानन मुनीश्वर आणि इतर यांनी पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकार्‍यांकडून मूर्तीची पहाणी व्हावी, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे १४ आणि १५ मार्च २०२४ या दिवशी करवीरनिवासिनीच्या मूर्तीची पहाणी झाली. त्यानंतर तज्ञांनी वरील निरीक्षण नोंदवले आहे. या सुनावणीच्या वेळी अधिवक्ता नरेंद्र गांधी, अधिवक्ता ॐकार गांधी, वादी गजानन विश्वनाथ मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर आदी उपस्थित होते.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या मुखाच्या डावीकडील भागाची झालेली झीज

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या चरणांची झालेली झीज

पुन्हा एकदा रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा अशास्त्रीय सल्ला !

यावर उपाय म्हणून मूर्ती बळकट करण्याकरता ‘ईथील सिलिकेट’चे द्रव्य वापरून हे तडे बुजवता येतील, तसेच मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागतील. शेवटी रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल’, असा सल्ला देण्यात आला आहे.

त्यासह वेळोवेळी मूर्तीचे निरीक्षण करून योग्य ती काळजी घेणे, मूर्तीला स्नान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घेणे, मूळ मूर्तीला पुष्पहार वगैरे न घालता केवळ उत्सव मूर्तीला फुलांचे हार घालणे. गर्भगृहातील संगमरवर काढणे, कीटकांचा उपद्रव होऊ नये, याकरता योग्य ती उपाययोजना करणे, तसेच आर्द्रता आणि तापमान नियंत्रित करणे, अलंकार आणि किरीट घालतांना योग्य ती काळजी घेणे अशा प्रकारच्या सूचनाही केल्या आहेत.

गेल्या ६८ वर्षांत मूर्तीवर वारंवार वज्रलेपन किंवा वज्रलेपनाच्या नावाने अशास्त्रीय ‘रासायनिक संवर्धन’ केले जात आहे. सध्याचे रासायनिक संवर्धन हे धर्मशास्त्राचा अभ्यास नसलेल्या पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार केले जात आहे. त्यामुळेच वारंवार ‘रासायनिक संवर्धन’ करूनही मूर्तीची झीज थांबत नाही. यापुढे धर्मशास्त्रातील जाणकारांचा समादेश देऊनच निर्णय घेणे आवश्यक आहे !