रंगपंचमीचा सण भारी, भक्तीरंगात रंगला श्रीहरि ।

संत मीराबाईंनी वृंदावनात पाहिलेल्या राधा-श्याम यांच्या रंगपंचमीच्या भावदृश्याचे सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी काढलेले भावचित्र आणि त्याविषयी त्यांना स्फुरलेले भावकाव्य !

सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी रेखाटलेले रंगपंचमीचा प्रसंग दर्शवणारे भावचित्र

‘संत मीराबाई वृंदावनात गेल्या होत्या. तेव्हा त्यांना द्वापरयुगातील वृंदावनाचे दर्शन झाले. तिथे त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे दिव्य दर्शन होऊ लागले. त्यांना श्याम (कृष्ण) आणि राधा रंगपंचमी खेळतांनाचे भावदृश्य दिसले. हे दृश्य पाहून संत मीराबाई भावविभोर झाल्या आणि त्यांच्या मुखमंडलावर भगवान श्रीकृष्णाप्रतीचा उत्कट भाव दिसू लागला. वर्ष २०१३ मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने मला संत मीराबाईंनी वृंदावनात पाहिलेल्या भावदृश्यांचा दृष्टांत झाला आणि माझ्याकडून त्या रंगपंचमीचा प्रसंग दर्शवणारे भावचित्र रेखाटले गेले. मला त्या भावप्रसंगाचे वर्णन करणारी सुंदर कविताही स्फुरली. हे भावचित्र आणि ही भावकविता मी श्रीराधेश्याम यांच्या चरणी सविनय अर्पण करते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

प्रेमाची उधळण करूनी, भक्तीरंगाने वृंदावन सजवूनी ।
गोपी गेल्या देहभान हरपून, श्याम रंगात त्या रंगल्या ।। १ ।।

लपूनी ढगामागे चंद्रमा पहातो चोरून नक्षत्रांना ।
फांदीवर बसून कान्हा मारून पिचकारी भिजवी गोपींना ।। २।।

होळीच्या रंगात भक्ती मिसळूनी, प्रीतीचा रंग नभी उधळूनी ।
श्याम रंगाने रंगल्या गवळणी, कृपावंताला (टीप) केली आर्त विनवणी ।। ३ ।।

क्षणोक्षणी व्याकुळ होई राधा, जळी स्थळी दिसे तिला कान्हा ।
अकस्मात् तो समोर येता, शुद्ध हरपून पहात राहे त्याला राधा ।। ४ ।।

हृदयी फुलले भावसुमन, कृष्णचरणी समर्पित झाले अंतर्मन ।
राधेचा भाव परमपावन, कृष्णमय झाले सारे वृंदावन ।। ५ ।।

कृष्ण वसे राधेच्या हृदयसिंहासनी, समर्पणभाव त्यास अर्पूनी ।
हात जोडूनी आली श्रीचरणी, शरणागतभावात ती न्हाली ।। ६ ।।

भक्तीसरोवर अती निर्मळ, त्यात उमलले कृष्णकमळ ।
राधाकृष्णाचा प्रीतीसंगम, त्यातून झाला भक्तीगंगेचा उगम ।। ७ ।।

पाहून राधेची अनन्य भक्ती, मधुर प्रेमरसाचे पान करून ।
प्रसन्न होऊनी राधेवरी, करी कृष्ण कृपेचा वर्षाव ।। ८ ।।

कृष्णभक्तीचे रहस्य जाणूनी, भगवंताची कृपा अनुभवूनी ।
धन्य झाली राधाराणी, श्रीकृष्णाची ती गाई गाणी ।। ९ ।।

तन-मन सारे ज्ञानगंगेत न्हाले, चित्त आनंदडोहात डुंबले ।
राधा झाली आत्मज्ञानी, गेली ती भवसागर पार करूनी’ ।। १० ।।

(टीप – श्रीकृष्णाला)

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक