मुंबई – देशभक्तीवर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अजय सिंह सेंगर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन दिले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
अजय सिंह सेंगर यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक नागरिकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे देशप्रेम जागृत होणे आवश्यक आहे. गांधीवादाला आदर्श समजणारे राजकीय पक्ष आणि जनता यांना गांधी यांचे खरे स्वरूप समजणे आवश्यक आहे. ‘गांधी हिंदुविरोधी होते’, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ‘देशाला स्वातंत्र्य गांधी यांच्यामुळे मिळाले’, ही अफवा या चित्रपटामुळे दूर होणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यवीरांचे सत्य प्रदर्शित करणारा आहे. या चित्रपटाविषयी जगभरातील अनिवासी भारतियांमध्येही अभूतपूर्व उत्साह आहे. हा चित्रपट येणार्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी शिक्षित करेल. देशाचे प्रथम पंतप्रधान होऊ नये, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा मलीन करण्याचे घोर पाप तत्कालीन काँग्रेस सरकारने केले. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग, समर्पण यांचा आदर्श समोर ठेवून देशभक्तीयुक्त पिढी सिद्ध करणे ही काळाची आवश्यकता आहे.