सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला उत्कट आणि समर्पित भाव !

१५.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात प.पू. फडकेआजी यांची साधना आणि सेवा यांसाठी असलेली तीव्र तळमळ पाहिली. आजच्या भागात ‘त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती समर्पित अन् उत्कट भाव कसा होता ?’ ते दिले आहे.

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/773846.html

(भाग २)

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा समर्पित अन् उत्कट भाव !

प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके

५ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रेल्वेचा डबा शोधायला लागू नये’, यासाठी एक घंटा आधी रेल्वेस्थानकात पोचून त्यांच्या डब्याजवळ उभे रहाणे : ‘वर्ष १९९६ मध्ये प.पू. फडकेआजी एकदा प.पू. डॉक्टरांच्या समवेत विदर्भात प्रचारासाठी जाणार होत्या. त्यांची रेल्वे सुटण्याची वेळ संध्याकाळी ६ वाजता होती. प.पू. फडकेआजी १ घंटा आधीच दादर रेल्वेस्थानकावर पोचल्या. गाडी स्थानकात आल्यावर त्यांनी त्यांचे सामान त्यांच्या जावयांना (कै. अरविंद गाडगीळ, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) त्यांच्या जागेवर (सीटवर) ठेवायला सांगितले आणि त्या प.पू. डॉक्टरांच्या डब्याजवळ जाऊन उभ्या राहिल्या. ‘रेल्वेस्थानकात आल्यावर प.पू. डॉक्टरांचा डबा शोधण्यात वेळ जायला नको’ आणि ‘मला पाहून प.पू. डॉक्टर लगेचच या डब्याजवळ येतील’, असा त्यांचा भाव होता.

५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांविषयी असलेला भाव ! : वर्ष १९९८ मध्ये साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले. तेव्हा प.पू. फडकेआजी पुणे येथे रहात होत्या. त्याच इमारतीत साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे २ वर्गणीदार रहात होते. प्रत्येक शुक्रवारी प.पू. फडकेआजी इमारतीतील वाचकांच्या घरी जाऊन त्यांना विचारायच्या, ‘‘तुम्हाला साप्ताहिक वेळेवर मिळते ना ? काही अडचण नाही ना ?’’ तेव्हा प.पू. फडकेआजींचे वय ६९ वर्षे होते. प.पू. फडकेआजी इमारतीच्या पहिल्या माळ्यावर रहात होत्या, तर दोन्ही वाचक इमारतीतील चौथ्या माळ्यावर रहात होते. माझी मोठी बहीण (सौ. शोभना करमरकर) प.पू. फडकेआजींना म्हणायची, ‘‘तुला ते वाचक भेटतील, तेव्हा त्यांना विचार. तू कशाला ४ जिने चढून वर जातेस ?’’ प.पू. फडकेआजी तिला म्हणाल्या, ‘‘हा माझ्या श्री गुरूंचा अंक आहे. तो त्यांना वेळेतच मिळायला हवा. मी इथे रहाते, म्हणजे ‘त्यांना अंक वेळेवर मिळाला कि नाही’, हे पहाणे माझे दायित्व आहे.’’

५ इ. ‘घर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आहे’, या भावाने घराची चावी त्यांच्या छायाचित्राजवळ ठेवणे : देवद, पनवेल येथे सनातनच्या संकुलात वास्तव्याला आल्यावर प.पू. फडकेआजी घराची चावी प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ ठेवायच्या आणि आम्हाला सांगायच्या, ‘‘हे माझे घर नाही. गुरुदेवांचे आहे; म्हणून मी घराची चावी त्यांच्या छायाचित्राजवळ ठेवते. तेच घर सांभाळतात.’’

५ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या अपार भावामुळे देहभान हरपून त्यांच्यासाठी खाऊ सिद्ध करणार्‍या प.पू. फडकेआजी !

५ ई १. परात्पर गुरु डॉ. आठवले देवद येथून गोवा येथे जातांना प.पू. फडकेआजींनी त्यांच्यासाठी खाऊ करून देण्याचे ठरवणे : प.पू. फडकेआजी देवद, पनवेल येथील सनातन संकुलात रहायला आल्यावर एकदा प.पू. डॉक्टर देवद आश्रमात ३ – ४ दिवस वास्तव्याला आले होते. तेव्हा एक दिवस संध्याकाळी प.पू. फडकेआजी मला म्हणाल्या, ‘‘प.पू. डॉक्टर उद्या सकाळी गोव्याला जाणार आहेत. आपण त्यांना १ किलो मुगाच्या पिठाचे लाडू करून देऊया. माझ्याकडे साजूक तूप आहे.’’

५ ई २. ‘गुरुचरणी अर्पण करायची प्रत्येक गोष्ट पूर्ण शुद्ध असावी’, या भावाने मुगाच्या डाळीचे पीठ घरी करून त्याचे लाडू करून ते अर्पण करणे : मुगाच्या डाळीचे पीठ करण्याविषयी आमच्या दोघींमध्ये झालेला संवाद येथे दिला आहे.

श्रीमती मनीषा अरविंद गाडगीळ

प.पू. फडकेआजी : गिरणीतून पीठ दळून आणले की, त्यात अन्य पिठे मिसळून येतात; म्हणून घरीच ‘मिक्सर’वर मुगाच्या डाळीचे पीठ करूया.

मी (श्रीमती मनीषा गाडगीळ) : त्याला फार वेळ लागेल.

प.पू. फडकेआजी : गुरुदेवांसाठी करायचे आहे, मग कितीही वेळ लागला, तरी चालेल.

‘गुरुचरणी अर्पण करायची प्रत्येक गोष्ट पूर्ण शुद्ध असावी’, या भावाने त्यांनी मुगाच्या डाळीचे पीठ घरी करून त्याचे लाडू केले. सर्व होईपर्यंत रात्रीचे ३:३० वाजले. त्यानंतर प.पू. फडकेआजींनी थोडी विश्रांती घेतली. काहीच वेळाने त्या उठल्या आणि सर्व आवरून पहाटे ५.३० वाजता प.पू. डॉक्टरांना लाडू देण्यासाठी आश्रमात गेल्या. यातून त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला अपार भाव मला शिकता आला.

५ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करण्यासाठी झोपेवर मात करून रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत समष्टीसाठी नामजप करणे : १३.१२.२००२ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी प.पू. फडकेआजींच्या निवासस्थानी येऊन त्यांना ‘सनातनच्या पहिल्या संत’ घोषित केले. २०.५.२००३ या दिवशी प.पू. फडकेआजींचा ७५ वा वाढदिवस देवद आश्रमातील साधकांनी भावपूर्णरित्या साजरा केला. २१.५.२००३ या दिवसापासून प.पू. डॉक्टरांनी प.पू. फडकेआजींना रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत समष्टीसाठी नामजप करायला सांगितला. तेव्हा प.पू. फडकेआजींना सेवा मिळाल्याचा पुष्कळ आनंद झाला. प.पू. फडकेआजी रात्री १२ वाजता नामजपाला बसत. त्यांना मध्यरात्री २ वाजता थोडी झोप येत असे; पण झोप आल्यावर त्या लगेचच उठून काठी घेऊन फेर्‍या मारत पहाटे ४ वाजेपर्यंत नामजप पूर्ण करत असत. त्यानंतरच त्या झोपायच्या आणि पुन्हा नेहमीच्या वेळेत ६.३० वाजता उठायच्या. तेव्हाही त्या पुष्कळ उत्साही असायच्या. जुलै २००३ मध्ये रुग्णाईत होईपर्यंत पावणेदोन मास त्यांनी असा नामजप केला.

५ ऊ. कर्तेपणा नसल्यामुळे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले शक्ती देऊन नामजप करून घेत आहेत’, असा भाव असणे : ‘रात्री नामजप करायला कसा जमतो ?’, असे कुणी विचारल्यास त्या सहजतेने सांगायच्या, ‘‘मी कुठे काय करते ! ७५ व्या वर्षी रात्री जागणे माझ्यासाठी अशक्यच आहे. प.पू. डॉक्टरच माझ्याकडून नामजप करून घेतात आणि त्यासाठी मला शक्तीही देतात. नाहीतर ते अशक्यच आहे.’’

५ ए. ग्लानी असतांनाही परात्पर डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करण्याचा ध्यास असणे आणि परात्पर डॉ. आठवले यांनी त्यांच्या तळमळीचे कौतुक करणे : परात्पर गुरु डॉक्टर मिरज आश्रमात असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी प.पू. फडकेआजी जुलै मासात मिरज आश्रमात गेल्या आणि तिथेच रुग्णाईत झाल्या. १८.८.२००३ या दिवशी आम्ही प.पू. आजींना मिरज आश्रमातून देवद, पनवेल येथील त्यांच्या घरी घेऊन आलो. त्यानंतर एक दिवस त्यांना त्रास होत असल्याने त्या पुष्कळ ग्लानीत होत्या.

प.पू. फडकेआजींचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा नामजप अखंड चालूच असायचा; म्हणून प.पू. डॉक्टरांनी त्यांना पोटावर हात ठेवून न्यास करायला सांगितला होता. ग्लानीत असूनही त्या ‘स्वतःचा हात पोटावर आहे ना ?’ याकडे लक्ष ठेवत होत्या. मध्येच त्यांचा हात पोटावरून बाजूला  सरकायचा, तेव्हा त्या लगेच पुन्हा हात पोटावर ठेवत होत्या. काही वेळाने डोळे पूर्ण उघडल्यावर त्यांनी आधी मला विचारले, ‘‘माझा हात पोटावर होता का ? ग्लानीमुळे माझ्या ते लक्षात येत नव्हते. प.पू. डॉक्टरांनी न्यास करायला सांगितला होता ना ? तू त्यांना माझा निरोप दे, ‘मला पुष्कळ ग्लानी असल्यामुळे पोटावर हात नीट ठेवता आला नाही.’’ हे सर्व मी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘त्यांची आज्ञापालनाची तळमळ किती आहे ना !’’

५ ऐ. ‘तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने नामस्मरण होत असल्याने वेदना सुसह्य होतात’, असा भाव असणे : तेव्हा प.पू. फडकेआजींना होणारे शारीरिक त्रास वाढत होते. काही वेळा शारीरिक त्रास वाढल्यावर त्या वैखरीने नामजप करत असत. वेदना न्यून झाल्यावर त्या मला सांगायच्या, ‘‘इतक्या वेदना होत असतांनाही प.पू. डॉक्टरांच्या कृपेने माझ्याकडून नामस्मरण होते. त्यामुळे मला वेदना सुसह्य होतात. माझा नामजप अखंड होत आहे. आता नाम थांबतच नाही.’’

६. प.पू. फडकेआजींना रात्री तहान लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिकेला झोपेतून जाग येऊन तिला प.पू. फडकेआजींना तहान लागल्याची जाणीव होणे

एक दिवस मला मध्यरात्री २.३० वाजता जाग आली आणि माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. फडकेआजींना पाणी हवे असेल.’ मी पाहिले, तर खरोखरच त्या जाग्या होत्या आणि त्यांना पाणी हवे होते. मी पाणी दिल्यावर त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या म्हणाल्या, ‘‘प.पू. डॉक्टर माझी किती काळजी घेतात !’’

‘प.पू. फडकेआजींच्या वरील सर्वच उदाहरणांतून शिकण्याची दृष्टी देऊन अध्यात्मातील विविधांगी पैलू लक्षात आणून दिले’, यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता ! ‘या उदाहरणांतून शिकता येऊन माझ्याकडूनही गुरुदेवांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होऊ देत’, अशी त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना !’

(क्रमशः)

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे) (प.पू. फडकेआजी यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.२.२०२४)