देवाच्या अनुसंधानात असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पनवेल, जिल्हा रायगड येथील कु. काव्यांश जुनघरे (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. काव्यांश जुनघरे हा या पिढीतील एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(‘वर्ष २०१९ मध्ये कु. काव्यांश जुनघरे याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती आणि आता वर्ष २०२४ मध्येही त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)

फाल्गुन शुक्ल अष्टमी (१७.३.२०२४) या दिवशी पनवेल, रायगड येथील बालसाधक कु. काव्यांश जुनघरे याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. अमृता जुनघरे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्यामध्ये जाणवलेले वैशिष्टपूर्ण पालट खाली दिले आहेत.

कु. काव्यांश जुनघरे याला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. काव्यांश जुनघरे

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. उत्तम आकलनक्षमता : ‘काव्यांशला शाळेत शिकवलेला अभ्यास सहज लक्षात रहातो, तसेच त्याला श्लोक आणि आरती लगेच पाठ होते.

१ आ. इतरांचा विचार असणे

सौ. अमृता जुनघरे

१. माझा हात दुखत असतांना तो माझ्या हाताला अत्तर आणि कापूर लावतो. त्यामुळे मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतात. तो माझे हात दाबून देतो आणि मला बरे वाटावे; म्हणून देवाला प्रार्थना करतो. मला काही त्रास होत असतांना किंवा काही लागले असतांना तो माझी काळजीने विचारपूस करतो. तो मला घरातील कामांमध्ये साहाय्य करतो.

२. एकदा इमारतीतील उद्वाहक (लिफ्ट) बंद पडल्याने उद्वाहकामध्ये एक व्यक्ती अडकली होती. ती बाहेर निघावी आणि बाहेरच्या माणसांना तिला काढता यावे; म्हणून काव्यांश प्रार्थना करत होता. तेव्हा तो म्हणाला, ‘‘त्या व्यक्तीला नामजप ठाऊक असता, तर तिला भीती वाटली नसती.’’

१ इ. त्यागी वृत्ती : गुरुपैर्णिमेच्या दिवशी काव्यांशने त्याच्याकडील जमा झालेले ११ रुपये गुरुपौर्णिमेचे अर्पण म्हणून आणून दिले.

१ ई. देवाची आवड : काव्यांशला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आवडतात. त्याला श्री गणपति हा देव विशेष आवडतो. तो गणपतीची आरती म्हणतो आणि जयजयकार करतो. तो मानसपूजा करतो आणि भावजागृतीचे प्रयोगही करतो. त्याला कुणीतरी गणपतीची मूर्ती भेट दिली आहे. तो तिला स्नान घालून तिची पूजा करतो.

२. काव्यांशच्या स्वभावामध्ये झालेले पालट

अ. पूर्वी तो अक्षर चांगले काढत नसे. आता तो स्वतःहून चांगले अक्षर काढतो.

आ. तो इतरांमध्ये सहजपणे मिसळतो.

इ. त्याच्या बोलण्यामध्ये स्थिरता आली आहे.

ई. त्याला दैवी बालकांचा ‘ऑनलाईन’ सत्संग दाखवला होता. त्यानंतर त्याने त्याच्या एका चुकीसाठी प्रायश्चित्त घेतले होते.

३. कु. काव्यांशमध्ये आध्यात्मिक स्तरावर जाणवलेले पालट

३ अ. कु. काव्यांशची साधना आतून चालू आहे आणि याची मला क्षणोक्षणी प्रचीती येते. त्याला काहीही सांगितलेले नसतांना आणि शिकवलेले नसतांनाही तो काही कृती स्वतःहून अगदी सहजपणे अन् उत्स्फूर्तपणे करतो.

३ आ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

१. घरात कुणाला काही त्रास होत असेल, तर त्या संबंधी काव्यांशला काही ठाऊक नसतांनाही तो त्यांच्यासाठी उपाय सूचवतो, उदा. एकदा त्याच्या वडिलांच्या पोटाच्या वरील भागात वेदना होत होत्या. त्या वेळी काव्यांशने त्यांना १ व्यायाम प्रकार करण्यास सांगितला. तो केल्यावर त्यांना लगेच बरे वाटले.

२. सनातन संस्थेच्या कार्यक्रमाच्या वेळी त्याला सर्वत्र पिवळा आणि निळा प्रकाश दिसतो.

३. प्राणशक्तीवहन पद्धतीप्रमाणे नामजप शोधण्यास सांगितल्यावर त्याला त्रासांचे स्थान लक्षात येते.

३ इ. आध्यात्मिक उपायांचे गांभीर्य

१. काव्यांश काही वेळा माझी दृष्ट काढतो आणि प्रार्थनाही करतो.

२. तो घरात दिवा आणि उद्बत्ती लावणे, वास्तुशुद्धी करणे, तीर्थ बनवणे, अशा प्रकारच्या सेवा करतो. तो प्रत्येक अवयवावरील अनिष्ट शक्तीचे आवरण काढतो. तो त्याच्या वडिलांना नामजपादी उपाय करण्यास सांगतो.

३. त्याची स्वतःची उपायांच्या साहित्याची पिशवी आहे. त्यात त्याने जपमाळ, गोमूत्र, वही, अत्तराचे खोके, साबण, उद्बत्तीच्या पुड्याचे वेष्टन इत्यादी साहित्य ठेवले आहे.

४. आम्ही बाहेर जातांना तो जयघोष करण्याची आठवण करून देतो. तो आमच्या चारचाकी गाडीचे चालक आणि त्यांचे मित्र यांना नामजप करण्यास सांगतो.

५. त्याला दुपारी विश्रांती घेण्यास सांगितल्यावर तो विश्रांती न घेता ‘आपण नामजप करूया’, असे म्हणतो.

३ ई. कृतज्ञताभावात असणे : काव्यांशला कुणी काही साहाय्य केले, तर त्याची त्याला त्याची जाणीव असते. एकदा त्याचा वाढदिवस असतांना सनातनच्या ६९ व्या संत पू. अश्विनी पवार त्याच्याशी भ्रमणभाषवर बोलल्या. त्यानंतर दुसर्‍या दिवशी एक साधक आमच्या घरी सेवेनिमित्त आले होते. त्यांनी त्याला चॉकलेट दिले. तेव्हा ‘ते चॉकलेट पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी दिले’, असा भाव ठेवून त्याने कृतज्ञता व्यक्त केली.

३ उ. अनुसंधानात असणे

१. काव्यांशला काही दुखापत झाल्यावर तो म्हणतो, ‘‘मला काही झाले नाही. परात्पर गुरु डॉक्टर माझे रक्षण करतात.’’ स्थुलातील; परंतु करण्यास कठीण वाटणार्‍या गोष्टींसाठी तो स्वतःहून प्रार्थना करतो.

२. परीक्षा चालू होण्यापूर्वी आणि झाल्यावर तो प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त करतो. तेव्हा ‘त्याच्या प्रार्थना परात्पर गुरु डॉक्टर ऐकत आहेत आणि ते त्या पूर्ण करत आहेत’, असे त्याला वाटते.

३. काव्यांशला पुठ्ठ्याच्या खोक्याची परात्पर गुरु डॉक्टरांची खोली बनवून दिली होती. तेव्हा त्याला ‘त्या खोलीमध्ये परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, असे त्याला जाणवायचे.

४. तो म्हणतो, ‘‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्याशी बोलतांना माझा नामजप चालू असतो.’’ त्याला मधेमधे सद्गुरु अनुराधाताई, सनातनच्या ६९ व्या संत पू. सौ. अश्विनी पवार आणि सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांची आठवण येते.

५. सुटीच्या कालावधीत मी त्याला एक पुठ्ठ्याच्या मंदिर बनवून दिले होते. तो प्रतिदिन त्यातील गणपतीच्या मूर्तीला स्नान घालणे, आरती करणे, धूप दाखवणे, वास्तूशुद्धी करणे, तीर्थ-प्रसाद देणे, चरणांवर हळद-कुंकू वाहणे, अशा कृती करतो. ‘त्याच्यातील भक्तीभावामुळे गणपतीच्या मूर्तीमध्ये पालट होत आहे’, असे मला वाटते.

३ ऊ. अहं अल्प असणे : काही कारणास्तव मी काव्यांशवर रागावले, तर तो दुसर्‍या क्षणाला माझ्याशी प्रेमाने बोलायला येतो. त्याच्याकडून झालेल्या अयोग्य कृतीसाठी तो क्षमा मागतो.

३ ए. तत्त्वनिष्ठपणे चूक सांगणे : माझ्याकडून जर अनावश्यक गोष्टींमध्ये कुठे वेळ वाया घालवला जात असेल, तर तो माझ्याकडे येऊन मला त्याची जाणीव करून देतो. माझ्याकडून काही अयोग्य कृती झाली किंवा अयोग्य बोलले गेले, तर तो त्याची जाणीव करून देतो.

आधी मला असे वाटायचे की, ‘मी काव्यांशला घडवणार आहे. त्याच्यावर संस्कार करणार आहे. मी त्याच्यामध्ये गुणवृद्धी करणार आहे.’ त्यासाठी माझा अट्टाहासही असायचा आणि त्याच्याकडून अपेक्षा असायच्या; पण काही कालावधीमध्ये माझ्या सेवेची व्याप्ती वाढली असल्यामुळे मला त्याला फार वेळ देता येत नव्हता किंवा पूर्वीसारखे त्याला घेऊन बसणे आणि नामजप करवून घेणे, असेही होत नव्हते. माझ्याकडून त्याच्यासाठी काहीच प्रयत्न होत नसतांनाही त्याच्यात झालेले हे पालट पाहून मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘सर्वकाही गुरुदेवच करत आहेत. त्यांनाच दैवी बालकांची काळजी आहे. तेच कर्ता-करविता आहेत’, याची मला जाणीव झाली. गुरुमाऊलीने माझ्याकडून काव्यांशविषयी लिखाण करून घेतले. आम्हाला दैवी बालकाचे पालक होण्याचे भाग्य दिले. त्याबद्दल आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– सौ. अमृता जुनघरे (कु. काव्यांशची आई), खांदा कॉलनी, पनवेल, जिल्हा रायगड. (१८.६.२०२३)

  • यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.