उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. यदुवीर चौधरी हा या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
_____________________________
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वर्धा येथील चि. यदुवीर गुंजन चौधरी याची त्याची आई, आजी आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. रिया गुंजन चौधरी (यदुवीरची आई), वर्धा (सध्या रहाण्याचे ठिकाण बेंगळुरू)
गर्भधारणेपासून प्रसुतीपर्यंत
१. गर्भधारणा लवकर झाल्यामुळे कृतज्ञता व्यक्त होणे : ‘माझे नाडी भविष्य आणि जन्मपत्रिका (कुंडली) यांनुसार ‘पुष्कळ प्रयत्नांनंतर अन् उशिरा मूल होईल’, असे मला सांगितले होते. तसेच ‘माझे यजमान आणि माझी नाडी एक असल्यानेही मूल होण्यास अडचणी येतील’, असे आम्हाला सांगितले होते; परंतु मला गर्भधारण लवकर झाली. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉक्टरांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती) कृतज्ञता व्यक्त केली.
२. विविध गर्भसंस्कार करणे : गर्भधारणेच्या कालावधीत सनातनचा ग्रंथ ‘मुलांचे संगोपन – खंड २ : आपले बाळ – २’ यातील बाळासाठी दिलेल्या प्रार्थना नियमित करणे, स्तोत्रपठण करणे, मानसपूजा करणे, ‘स्वभावदोष निर्मूलन’ या ग्रंथ मालिकेचे वाचन करणे, नियमित नामजप करणे, व्यायाम करणे, भागवत ऐकणे, गर्भगीता ऐकणे, भावसत्संग ऐकणे इत्यादी आध्यात्मिक कृती मी करत होते. या काळामध्ये मला परात्पर गुरुमाऊलींचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) साक्षात् दर्शन झाले. परात्पर गुरुमाऊलींचा ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा बघायला मिळाला. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील यज्ञाचा लाभ घेता आला. सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांची चित्रफीत बघायला मिळाली. अशी माझ्या गर्भसंस्कारांची काळजी माझ्या गुरुमाऊलींनी घेतली. (गर्भगीता – गर्भावस्थेत गर्भावर संस्कार करण्यासाठी ऐकायची गीता. यात श्रीकृष्ण-अर्जुन संवादाचे, म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेचे सार आहे.)
३. आपल्या वागण्याचा परिणाम बाळावर होतो; म्हणून मी माझ्या स्वभावामध्ये पालट केले. हे परात्पर गुरु डॉक्टरांमुळे मला शक्य झाले.
४. प्रसुतीच्या वेळी आध्यात्मिक उपाय आणि प्रार्थना करणे : प्रसुतीच्या रात्री २ वाजल्यापासून माझ्या पोटात दुखू लागले. माझ्या आईने आणि माझ्या आत्याने माझ्याकडून नामजपादी उपाय करून घेतले, तसेच मी कुलदेवीला प्रार्थना केल्या. नंतर प्रसुतीच्या वेळी आधुनिक वैद्यांनी हनुमान चालीसा म्हटली आणि दुपारी बाळाचा जन्म झाला.
जन्म ते १ मास
१. बाळाची पाचवीची पूजा झाल्यानंतर ‘देवी सटवाई बाळाच्या समवेत आहे’, असे मला जाणवायचे.
२. मला बाळाचे नाव ‘यदुवीर’ म्हणजे कृष्णाचे नाव सुचले, तसेच माझ्या आत्याला आणि भावालाही हेच नाव सुचले.
दुसरा मास ते १ वर्ष
१. खेळकर आणि शांत : जे कोणी बाळाला बघायचे ते म्हणायचे, ‘अन्य मुलांच्या तुलनेत खेळकर बाळ आहे.’ त्याचे लसीकरण केले. तेव्हा सुई (इंजेक्शन) देतांना तो रडला आणि लगेच शांत झाला.
२. हसतमुख : यदुवीर कुणाजवळही लगेच जातो. त्याला ओळख लागत नाही. मी दिवसभर घरी नसले, तरीही तो घरी असेल, त्याच्या समवेत दिवसभर थांबतो. तो त्याच्याकडे बघणार्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहून हसतो.
३. नामजप आणि भजन ऐकण्याची आवड : बाळाच्या हाताच्या नेहमी मुद्रा असत. त्यामुळे ‘बाळ नामजप करत आहे’, असे मला जाणवायचे. त्याला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हे नामजप आणि श्रीरामाचे भजन पुष्कळ आवडायचे. त्याला संगीताची विशेष ओढ जाणवते. तो संगीत मनापासून ऐकतो आणि चांगला प्रतिसाद देतो. मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करतांना तो ‘दत्त दत्त’, असे म्हणतो.
४. शांतीचा विधी करतांना ५ पाय असलेली गाय मिळणे : यदुवीर ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मला असल्याने त्याची शांती आणि कनिष्ठ ग्रहांचा जप करायला सांगितला होता. तेव्हा आम्ही सनातनच्या साधक पुरोहितांकडून ही पूजा करवून घेतली. पूजेमध्ये आम्हाला गाय हवी होती; पण कल्याण (ठाणे) येथे आम्हाला गाय सापडत नव्हती. तेव्हा अकस्मात एका व्यक्तीने सांगितल्यानुसार आम्हाला ५ पायांची गाय मिळाली. तेव्हा पुरोहित श्री. श्रेयस पिसोळकर म्हणाले, ‘‘ही देवगाय आहे.’’ हे ऐकून आम्ही देवतांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
५. घोषणा देणे आणि मंत्रजप ऐकणे : यदुवीरला घोषणा आवडतात. तो त्याच्या हातांची मूठ बांधतो. तेव्हा असे वाटते, ‘तो घोषणा देत आहे.’ मी यदुवीरला प्रतिदिन सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मी: ।’, ‘समुद्रवसने देवि ।’, हे श्लोक, तर अंघोळीच्या वेळी सप्तनद्यांचा मंत्र, जेवतांना ‘वदनि कवळ घेता ।’, झोपतांना ‘निद्रादेवी मंत्र’ ऐकवते. ते तो लक्षपूर्वक ऐकतो. तो सनातनच्या ‘ॐ चैतन्यवाणी ॲप’वरचे सर्व मंत्र ऐकतो.
६. देवाची आवड : मी ‘विठ्ठल विठ्ठल’ असे म्हटल्यावर यदुवीर आनंदाने नाचतो आणि टाळ्या वाजवतो. तो मंदिरात शांत रहातो. ‘सामाजिक धार्मिक कृती’ या सनातनच्या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मासाच्या तिथीला त्याची वाढदिवसाची पूजा करतो. तेव्हा तो आनंदी असतो. यदुवीरला जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची वेशभूषा घालून दिल्यावर त्याला आनंद झाला.
७. सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. अशोक पात्रीकर यांनी यदुवीरला कडेवर घेतले. तेव्हा यदुवीर त्यांच्याकडे बघून बोलत होता.
असे गुणी बालक केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आमच्या पोटी जन्माला आले आहे. ‘हे गुरुमाऊली, या सात्त्विक बाळाचे पालनपोषण योग्य रितीने आपणच आमच्याकडून करवून घ्यावे’, ही प्रार्थना.’
सौ. विजया भोळे (आजी, यदुवीरच्या आईची आई)
१. रक्तातील पांढर्या पेशी वाढण्यासाठी औषधोपचार आणि नामजपादी उपाय करणे : ‘रियाच्या नवव्या महिन्यात तिला तपासणीसाठी नेल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘पिण्याच्या पाण्याच्या बदलामुळे तिच्या रक्तातील पांढर्या पेशी कमी झाल्या आहेत’, असे सांगितले. त्यांनी तिला रुग्णालयात भरती करायला सांगितले आणि तिला प्रतिदिन सलाईनमधून इंजेक्शन दिले जात होते. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘अाता जर उपचार केले नाहीत, तर बाळावर परिणाम होऊ शकतो.’’ पू. पात्रीकरकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय आम्ही करत होतो. परात्पर गुरुदेवांनी या त्रासांतून तिला आणि बाळाला सुखरूप बाहेर काढले.
२. यदुवीरला कापूर आणि उदबत्ती यांचे उपाय करायला आवडते.
३. त्याला बघितल्यावर माझा थकवा दूर होतो आणि आनंद मिळतो.’
सौ. भार्गवी क्षीरसागर, वर्धा
१. ‘एकदा यदुवीर त्याच्या आजीकडे (आईची आई, सौ. विजया भोळे यांच्याकडे) आला होता. तेव्हा ‘घरात चैतन्य आले’, असे मला जाणवले.
२. त्याला मांडीवर घेऊन नामजप केला किंवा रामरक्षा ऐकवली, तर तो शांतपणे ऐकतो.
३. ‘तो नेहमी अनुसंधानात आहे’, असे मला जाणवते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १९.१०.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
|