देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. वेदांत झरकर यांना ‘भाव’ याविषयी देवाने सांगितलेली सूत्रे आणि त्यांनी अनुभवलेले भावविश्व !

एक दिवस मी देवाला म्हणालो, ‘देवा, तू किती सुंदर असे हे भावाचे जग निर्माण केले आहेस !’ त्या वेळी देवाने मला पुढील काही सूत्रे सांगितली.

‘भाव तेथे देव !’
श्री. वेदांत झरकर

१. ‘भाव म्हणजे सर्वस्व आहे.

२. भाव ही एक अशी अवस्था आहे की, ती ज्याची त्याने अनुभवायची असते.

३. भाव हा एक असा मार्ग आहे, ‘ज्यामध्ये देवाशी आपण थेट संवाद साधू शकतो. त्यामध्ये कुणीच आपल्याला अडथळा आणू शकत नाही.’

४. आपण जर देवाकडे भावपूर्णपणे साहाय्य मागितले, तर देवाला ते द्यावेच लागते. एक वेळ आपण कुणी साहाय्य मागितले तर विसरू; पण देव ते पूर्ण होईपर्यंत कधीच विसरत नाही.

५. भावात एक असा गोडवा आहे, ‘तो आपण घ्यायला लागलो की, अन्य सर्व थिटेच पडते.

६. एखादा ठेवलेला भाव किंवा त्यातून आलेली अनुभूती आपण परत वाचली किंवा तिचे स्मरण केले, तरी आपला भाव पुन्हा जागृत होतो.

७. ‘भाव तेथे देव !’ या उक्तीप्रमाणे भाव म्हणजे देवाचे सगुण रूप आहे.

८. एखादा भाव ठेवून अशक्य ते शक्य करता येते.

९. भावाविना कोणतीही कृती अपूर्णच आहे.

१०. भाव म्हणजे देवाने साधकांना दिलेला एक प्रसाद आहे. तो ग्रहण केल्यावर कितीही बुद्धीवादी व्यक्ती असली, तरी देव तिच्यामध्ये भावाची ज्योत निर्माण करतोच.

११. देवाने हे जे भावाचे निर्माण केलेले विश्व आहे, ते पुष्कळ अद्भुत, अत्यंत मोहक अन् आश्चर्यकारक आहे.

वरील सूत्रे मला केवळ देवाच्या कृपेने समजली. या बुद्धीवादी जिवाला भावाच्या ज्योतीने प्रज्वलित करणारे केवळ आणि केवळ सद्गुरु राजेंद्र शिंदे आहेत. त्यांच्या कृपेनेच मी आज देवाने निर्माण केलेल्या या भावाच्या विश्वातील काही क्षण अनुभवू शकलो.

मला नेहमी वाटायचे, ‘माझ्यात कधीच भाव निर्माण होऊ शकत नाही. मी केवळ बुद्धीने विचार करणारा आहे आणि कितीही प्रयत्न केले, तरी मला ते अशक्यच आहे.’ देवाने आज सद्गुरु दादांच्या मार्गदर्शनामुळे मला भावविश्वात नेले. याविषयी मी गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. वेदांत झरकर (वय २० वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल.