साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन साधकाला अयोग्य विचारांतून बाहेर पडण्यास साहाय्य करणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर (वय ४१ वर्षे) !

‘वर्ष २०२१ मध्ये गुरुदेवांच्या कृपेमुळे मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळाली. माझ्या मनात अनेक विचार होते. त्यामुळे माझ्या मनाचा संघर्ष होत होता. परिणामी माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नव्हते.

सौ. सुप्रिया माथूर

१. प्रतिमेच्या विचारांमुळे आढाव्यात स्वतःच्या गंभीर चुका  सांगणे  टाळणे आणि त्यावर सौ. सुप्रिया माथूर यांनी ‘आणखी खोलवर विचार व्हायला हवा’, असे सांगणे

श्री. विठ्ठल कदम

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्यात अनेक साधक आहेत, तर मी माझ्या चुका कशा सांगू ?’, असा विचार मनात येऊन मी माझ्या गंभीर चुका सांगणे टाळत असे. आढाव्यात मी माझ्या वरवरच्या चुका सांगत असे. त्यातून मला आनंद मिळत नव्हता. तेव्हा आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या सौ. सुप्रिया सुरजित माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) मला सांगत, ‘‘आणखी खोलवर जाऊन विचार व्हायला हवा.’’

२. ‘प्रक्रिया म्हणजे स्वतःत पालट करण्याची अमूल्य संधी आहे’, हे लक्षात येऊन आढाव्यात स्वतःच्या गंभीर चुका सांगण्यास आरंभ करणे

वरवरच्या चुका सांगितल्याने माझ्या मनाचा संघर्ष चालूच असायचा. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, म्हणजे स्वतःत पालट करण्याची अमूल्य संधी आहे.’ त्यानंतर ‘इतर काय म्हणतील ?’, याचा विचार न करता मी आढाव्यात माझ्या गंभीर चुका सांगण्यास आरंभ केला. तेव्हा मला सुप्रियाताईने ‘मी कुठे चुकतो ?’, हे सांगितले. त्या वेळी मी अंतर्मुख होऊन घडलेल्या सर्व प्रसंगांचे चिंतन केले.

३. स्वतःतील अहंच्या पैलूंची जाणीव होणे आणि आढाव्यात चुका सांगितल्यावर सौ. सुप्रिया माथूर यांनी साधनेविषयी योग्य दृष्टीकोन देणे

त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘माझ्यातील ‘अपेक्षा करणे आणि कर्तेपणा’ या अहंच्या पैलूमुळेच माझ्या मनाचा संघर्ष होत आहे. मला यातून बाहेर पडायचे असेल, तर माझे मन मोकळे करणे अपेक्षित आहे.’ नंतर मी सर्वच स्तरांवरच्या चुका सांगण्यास आरंभ केला. गुरुदेवांनीच मला सौ. सुप्रियाताईंच्या माध्यमातून साधनेविषयी योग्य दृष्टीकोन दिले.

४. गुरुकृपा संपादन करण्यासाठी मनातील अडथळे सांगून त्यांवर मात करायची असल्याची जाणीव होणे

तेव्हा कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर आले. अर्जुनाला लढाई करायची होती; पण मनात अनेक शंका असल्याने त्याने धनुष्य खाली ठेवले. त्यानंतर श्रीकृष्णाने गीतेद्वारे अर्जुनाच्या सर्व शंकांचे निरसन केले. त्याचप्रमाणे ‘मलाही माझ्या मनातील सर्व अडथळे आणि विचार सांगून त्यांवर मात करायची आहे अन् तसे केले, तरच मला गुरूंची कृपा अनुभवता येणार आहे’, हे मला शिकायला मिळाले.

‘हे गुरुमाऊली, ‘तुमच्या कृपेमुळे मला सुप्रियाताईंच्या माध्यमातून साधनेविषयी योग्य दृष्टीकोन मिळाले आणि अनेक अयोग्य विचारांतून बाहेर पडता आले’, याबद्दल तुमच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता !’

– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०२२)