१५ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घंटा नाद’ आंदोलन !
सांगली, १३ मार्च (वार्ता.) – गेल्या अनेक वर्षांपासून गोरक्षक संघटना आणि इतर शिवभक्त यांनी गोरक्षणार्थ बर्याच वेळा आंदोलने केली आहेत; परंतु आजपर्यंत सरकारला जाग आलेली नाही. येथील १०० फुटी रस्ता, गणेशनगरजवळ अनधिकृत पशूवधगृह चालू असून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेने’चे संस्थापक अध्यक्ष विनायक येडके यांनी १३ मार्च या दिवशी येथील सर्किट हाऊस येथे दुपारी १२ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घंटा नाद’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपस्थिती नोंदवावी’, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेचे ग्रामीण सांगली जिल्हाध्यक्ष श्री. शिवतेज सावंत, गोरक्षक सर्वश्री करण माने, रणजित जाधव, प्रज्वल सोनार, रोहित चव्हाण, भावेश नायक यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. विनायक येडके पुढे म्हणाले, ‘‘गणेशनगरजवळील पशूवधगृह अनधिकृत असून त्याला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनुमती नाही. या जागेत केवळ वैद्यकीय पडताळणी करून जे मांस येते ते मांस विकण्याची अनुमती नाही. तरीही कायद्याचा धाक नसल्याने तेथे जनावरांची कत्तल केली जात आहे. यात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमांचे सतत उल्लंघन केले जात आहे. सदरची मांस विक्री ही आपसांत संगनमत करून गोवंश हत्या केल्याने होत आहे. त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी आहे. त्याअंतर्गत अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. जनावरांची कत्तल केली म्हणून तेथील पशूवधगृहातील ९ जणांवर यापूर्वी गोहत्येचा गुन्हा नोंद झाला आहे.’’
येडके पुढे म्हणाले, ‘‘काही नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा लहुजी वस्ताद या महापुरुषांची नावे घेऊन तेथे अनधिकृत जनावरे आणि गोवंश यांच्या कतलीचे समर्थन करत आहेत. त्याचसमवेत मुकी जनावरे कापण्यास अनुमती नसतांनाही ती जनावरे कापून गोवंश हत्या करत आहेत. सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय प्राणी संवर्धन अधिनियम कायद्याचा विचार करून गोवंश संपुष्टात आणणार्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच गोरक्षकांसाठी विमा संरक्षण द्यावे. गोहत्येचे कोणतेही अनुचित प्रकार घडत असतील, तर ते प्रकार थांबवण्यासाठी शासनाचे सहकार्य लाभावे, अशी विनंती जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना करण्यात आली आहे.’’
संपादकीय भूमिका :सांगली येथे अनधिकृतपणे पशूवधगृह चालू असतांना ते बंद करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला हे दिसत नाही का ? प्रदूषण नियंत्रण मंडळातील संबंधित अधिकार्यांनाही हे लक्षात येत नाही का ? |