Karnataka Textbook Revision : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार शालेय अभ्यासक्रमात पेरियार, गिरीश कर्नाड आदी हिंदुद्वेष्ट्यांचे धडे समाविष्ट करणार !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने इयत्ता पहिली ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारणेला अंतिम रूप दिले आह. यामध्ये महत्त्वपूर्ण पालट करण्यात आले आहेत. याअंतर्गत ‘सनातन धर्म’वर आधारित धड्याव्यतिरिक्त मुलांना पी. लंकेश, सावित्रीबाई फुले, गिरीश कर्नाड, पेरियार, देवनूर महादेव, थिरुनाकुडू चिन्नास्वामी, नागेश हेगडे आदी या लेखकांच्या लिखाणांचाही समावेश आहे.

१. प्रा. मंजुनाथ हेगडे यांच्या अध्यक्षतेखालील पाठ्यपुस्तक पुनर्निरीक्षण समितीने तिचा अहवाल कर्नाटक सरकारकडे सादर केला आहे. समितीने सावित्रीबाई फुले आणि पेरियार यांसारख्या पुरोगामी लेखकांशी संबंधित विषयांचे धडे पुन्हा समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. तथापि समितीने टिपू सुलतान आणि हैदर अली यांच्याशी संबंधित धडे पुन्हा समाविष्ट करण्याची शिफारस केलेली नाही. हे धडे भाजप सरकारने हटवले होते.

२. या पाठ्यपुस्तकांमध्ये जैन आणि बौद्ध धर्मांविषयी स्पष्टीकरण देणारे नवीन अध्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यासमवेत ‘धर्म’ शब्दाऐवजी ‘रिलिजन’ असा पालट केला आहे.

३. यापूर्वी जून २०२३ मध्ये ‘कर्नाटक टेक्स्टबुक सोसायटी’ने पाठ्यपुस्तकांमध्ये काही पालट केले होते. यात रा.स्व. संघाचे संस्थापक पू. हेडगेवार यांच्यावरील धडा काढून त्याजागी शिवकोट्याचार्य यांचा ‘सुकुमार स्वामी काठे’ या धड्याचा समावेश केला होता. त्याच वेळी दहावीच्या कन्नड पाठ्यपुस्तकात शतावधानी आर्. गणेश यांच्या ‘श्रेष्ठ भारतीय चिंतानेगालू’ची जागा सारा अबुबकरच्या ‘युद्ध’ या धड्याने घेतली.

काँग्रेस सरकारला अराजकता, गोंधळ आणि ध्रुवीकरण निर्माण करायचे आहे ! – भाजपची टीका

भाजपचे आमदार आणि माजी उच्चशिक्षण मंत्री अश्‍वथ नारायण यांनी कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस राज्यघटना आणि कर्नाटकातील लोकांचा विश्‍वास यांचा आदर करत नाही. सरकारला अराजकता, गोंधळ आणि ध्रुवीकरण निर्माण करायचे आहे. सरकार सनातन धर्माचा आदर करत नाही. त्यामुळे ते सनातन धर्माच्या विरोधात असलेल्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आमच्या श्रद्धेच्या विरुद्ध आहे. याचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस सरकारला उघडे पाडण्यासाठी आम्ही जनजागृती करू. आम्ही या अभ्यासक्रमाला कडाडून विरोध करू आणि त्याचा समावेश होऊ न देण्याचा प्रयत्न करू.

संपादकीय भूमिका

काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवल्यावर हिंदू आणि त्यांच्या धर्माचा आत्मघात होतो, हे आता कर्नाटक राज्यातील, तसेच देशातील हिंदूंना प्रत्यक्ष उदाहरणातून लक्षात आले असेल आणि ते यापुढे अशी चूक करणार नाहीत, अशीच अपेक्षा !