पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील शेकडो प्राचीन धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार मिळण्यासाठी मुंबईत आंदोलन !

हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळांचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा लढा !

संघटित होऊन आंदोलन करताना हिंदुत्वनिष्ठ

मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत देशभरातील अनुमाने ३ सहस्र ६९३ संरक्षित स्मारके असून त्यामध्ये ८२० धार्मिक स्थळांचा समावेश आहे. मुळात धार्मिक स्थळे असलेल्या या पवित्र स्थळांना संरक्षित स्मारकांचा दर्जा दिल्यानंतर त्यांच्याकडे केवळ संरक्षित स्मारके म्हणून पाहिले जात आहे. येथील पूजाअर्चाही बंद असून चप्पल घालून आणि तोकड्या कपड्यांत जाऊन या धार्मिक स्थळांचे पावित्र्य नष्ट केले जात आहे. हिंदूंच्या या प्राचीन धार्मिक स्थळांचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आवाज उठवला आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील हिंदूंच्या सर्व धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार मिळावा, यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ६ मार्च या दिवशी दादर (पश्चिम) येथील केशवसूत पुलाजवळ आंदोलन केले.
या आंदोलनात विविध मंदिरांचे विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, भाविक आणि हिंदु धर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक धरून घोषणा देत हिंदूंनी धार्मिक स्थळी पूजेच्या अधिकाराची मागणी केली. याविषयी केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षर्‍या केल्या.

पूजाअर्चेचा हिंदूंचा धार्मिक अधिकार हिरावून घेता येणार नाही ! – सुनील कदम, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

श्री. सुनील कदम

हिंदूंची प्रार्थनास्थळे संरक्षित करतांना ती केवळ प्रदर्शनापुरती वा पुरातत्व खात्याला पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापर करण्याकरता नाहीत, हे पुरातत्व विभागाने लक्षात घ्यावे. स्वातंत्र्यापूर्वीच्या मोठ्या कालखंडात मोगल, पोतुर्गीज, डच, हूण, फ्रेंच, इंग्रज आदी परकीय आक्रमकांनी भारतावर आक्रमणे केली. या काळात अनेक प्राचीन धार्मिक स्थळांमधील पूजाअर्चा बंद करण्यास हिंदूंना भाग पाडण्यात आले. अनेक धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली. हिंदूंना कधीच पूजाअर्चा करता येऊ नये, यासाठी हे प्रकार येथे करण्यात आले; मात्र हिंदूंचा हा धार्मिक अधिकार हिरावून घेता येणार नाही.

श्री लेण्याद्री गणपतीच्या दर्शनासाठीचे शुल्क रहित करावे ! – बळवंत पाठक, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. बळवंत पाठक

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या अतीप्राचीन स्वयंभूमूर्ती श्री लेण्याद्री गणपतीच्या दर्शनासाठी केंद्रीय पुरातत्व विभाग भारतियांकडून प्रत्येकी २५ रुपये, तर विदेशी नागरिकांकडून ३०० रुपये आकारते. एखादा भक्त गरीब असेल, वा एखाद्याकडे पैसे नसतील, तर त्याने देवाचे दर्शन करायचे नाही का ? केंद्रीय पुरातत्व विभागाकडून होणारी ही भाविकांची लूट आहे. ‘हे शुल्क रहित करावे’, अशी महत्त्वाची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे.

धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार मिळावा, हे हिंदूंनी ठामपणे सांगायला हवे ! – सुनील पवार, अध्यक्ष, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड

सुनील पवार

बहुसंख्य असूनही हिंदू एकत्र येत नाहीत; म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून हिंदूंनी धर्मासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार मिळावा, हे हिंदूंनी ठामपणे सांगायला हवे.

सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा ! – प्रभाकर भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी, मुंबई

प्रभाकर भोसले

बहुसंख्य असूनही धार्मिक स्थळी पूजेच्या अधिकारासाठी अनुमती घ्यावी लागणे, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे. हिंदूंना अनुमती नाकारणारा पुरातत्व विभाग नावाचा पांढरा हत्ती पोसणे सरकारने बंद करावे. हिंदू एकत्र नसल्यामुळेच शिवरायांच्या भूमीत हिंदूंवर ही वेळ आली आहे. पूजेच्या अधिकारासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा.

अन्य मागण्या !

१. पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या परिसरातील अतिक्रमणे हटवावीत, या धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी पादत्राणे वर्ज्य करावीत.

२. महाराष्ट्रातील रायगडासह अनेक गड-दुर्ग यांवर मुसलमान पद्धतीचे थडगे बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटवण्यात यावे.
३. धार्मिक स्थळी, तसेच गड-दुर्ग येथे मद्यपान, धूम्रपान वा पावित्र्य भंग करणार्‍या कृती करण्यावर बंदी आणावी, तसेच हे नियम न पाळणार्‍यांवर कारवाईचे प्रावधान करावे.
सहभागी संघटना : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज, रायगड; हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, वज्रदल

घारापुरी गुहेतील शिवमंदिरात महाशिवरात्रीपासून नियमित पूजा करण्याचा अधिकार द्या !

मुंबईजवळील घारापुरी गुहेत (‘एलिफंटा केव्हज’मध्ये) ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या भव्य मूर्ती, तसेच प्राचीन शिवपिंडही आहे. या लेण्यांना भारतीय शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. पोर्तुगिजांच्या काळात या शिल्पांची तोडफोड केली गेली. ब्रिटिशांच्या काळात या शिल्पांवर गोळीबाराचा सराव करण्यात आला. त्यामुळे सद्य:स्थितीत येथील बहुतांश शिल्पे भग्न झाली आहेत. ही लेणी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून येथील शिवपिंडीची पूजाअर्चा बंद आहे. हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थळ असलेल्या, तसेच केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या घारापुरी लेण्यांतील शिवमंदिरात हिंदूंना महाशिवरात्रीपासून नियमित पूजा करण्यास अनुमती मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.