Goa LokSabha Seat : लोकसभेसाठी भाजपकडून श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यातून उमेदवारी घोषित

पणजी, २ मार्च (वार्ता.) : भाजपने अखेर २ मार्च या दिवशी सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघासाठीची उमेदवारी घोषित केली. भाजपने लोकसभेसाठी १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एकूण १९५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली असून यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे नाव समाविष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय मंडळाच्या अनेक बैठकांनंतर उमेदवारांची पहिली सूची घोषित करण्यात आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ५ वेळा खासदारपद भूषवले

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यापूर्वी ५ वेळा खासदार बनले आहेत. त्यांनी सर्वप्रथम वर्ष १९९९ मध्ये लोकसभेचे उत्तर गोवा मतदारसंघासाठी निवडणूक लढवली आणि त्या वेळी त्यांनी काँग्रेसचे अधिवक्ता रमाकांत खलप यांचा पराभव केला. वर्ष २००४ मध्ये काँग्रेसचे विल्फ्रेड डिसोझा यांचा, वर्ष २००९ मध्ये काँग्रेसचे जितेंद्र देशप्रभू यांचा, वर्ष २०१४ मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेसचे नेते तथा विद्यमान भाजपचे राज्यातील कृषीमंत्री रवि नाईक यांचा, तर वर्ष २०१९ मध्ये काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा पराभव केला. वर्ष २०१४ मध्ये श्रीपाद नाईक प्रथमच एक लाखांहून अधिक मताधिक्क्यांनी निवडून आले होते.