मुंबई, २९ फेब्रुवारी (वार्ता.) – शेतकर्यांच्या बांधावर जाऊन साहाय्य करणार, सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी करणार, अशा घोषणा तत्कालीन आघाडी सरकारने त्यांच्या काळात केल्या, त्याचे काय झाले ? याचे उत्तर आधी द्यावे. मगच आम्हाला प्रश्न विचारावेत. आज युती सरकारवर जे विरोधक बोलत आहेत, त्यांनी आणलेला प्रस्ताव म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा आहेत’, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली. विरोधी पक्षाने विधानसभेत २९३ नुसार राज्यातील विविध प्रश्नांवर युती सरकारला जाब विचारणारा प्रस्ताव मांडून चर्चा उपस्थित केली होती. या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, पत्रकार निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेला आक्रमणाचा विषय काढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कोण विचारत आहे ? ज्यांनी ‘एबीपी माझा’चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात बातमी दिली म्हणून त्याला कोरोनाच्या काळात फरफटत वांद्रे पोलीस ठाण्यात आणले, ते आज आम्हाला प्रश्न विचारत आहेत ? निखिल वागळे प्रकरणी तक्रार प्रविष्ट झाली आहे. पोलीस पुढील कारवाई करतील; पण एक निवृत्त नौदल अधिकार्याचा घरात घुसून डोळा फोडला. अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर कुणाच्या सांगण्यावरून गुन्हा नोंद झाला ? त्यामुळे तुम्ही आम्हाला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारू नये.