कोडीत (सासवड) येथे अफूची शेती करणार्‍या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक !

प्रतिकात्मक छायाचित्रं

सासवड (जिल्हा पुणे) –  पुरंदर तालुक्यामधील कोडीत या गावात शेतीत अफूची लागवड करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेदहा किलो वजनाची अफूची बोंडे जप्त केली आहेत. त्यांचे बाजारमूल्य २१ सहस्र रुपये इतके आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून दोघांना अटक केली आहे. दशरथ बडदे आणि तानाजी बडदे अशी त्यांची नावे आहेत.

शेतातील अफूचे पीक न दिसण्यासाठी कांदा आणि शेवंतीच्या फुलांची लागवड करण्यात आली होती. ‘अल्प कालावधीत झटपट पैसा मिळवता येतो’, अशा विचाराने गांजा, अफू अशा अमली पदार्थ वनस्पतींची अवैध लागवड करून त्यांची विक्री केली जात आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले आहेत.

संपादकीय भूमिका 

अमली पदार्थ वनस्पतींची लागवड करणार्‍यांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !