INC Karnataka Pro-PAK Slogans : राज्यसभा निवडणुकीत नसीर हुसेन विजयी झाल्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

  • भाजपने कर्नाटकातील घटनेचा व्हिडिओ प्रसारित करून केला आरोप !

  • काँग्रेसने आरोप फेटाळले !

काँग्रेसचे नेते नसीर हुसेन

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते नसीर हुसेन विजयी झाले. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा केला जात असतांना विधानसभेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, असा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. काँग्रेसने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

सौजन्य : इंडिया टूडे 

१. २७ फेब्रुवारी या दिवशी राज्यसभेच्या निवडणुकीत कर्नाटकमधील ४ पैकी ३ जागा काँग्रेसने जिंकल्या. यांपैकी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे राजकीय सचिव नसीर हुसेन हेही विजयी झाले.

२. यासंदर्भात भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हुसेन यांच्या विजयाचा आनंद साजरा करतांनाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात कार्यकर्ते ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत असल्याचा आवाज येत आहे. या विषयी मालवीय यांनी म्हटले की, काँग्रेसचे पाकिस्तानविषयीचे वेड धोकादायक आहे.

सौजन्य : ANI News)

३. नसीर हुसेन यांनी मात्र हे आरोप फेटाळत म्हटले आहे की, मी ‘नसीर हुसेन झिंदाबाद’, ‘काँग्रेस पार्टी झिंदाबाद,’ ‘नसीर खान झिंदाबाद’ आणि ‘नसीर साब जिंदाबाद’ अशा घोषणाच ऐकल्या. माध्यमांमध्ये जे काही दाखवले गेले, ते मी ऐकले नाही. जर मी ते ऐकले असते, तर मी आक्षेप घेतला असता, त्या विधानाचा निषेध केला असता आणि त्यांच्यावर आवश्यक कारवाईची मागणी केली असती !

४. काँग्रेसनेही घटनास्थळावरील मूळ व्हिडिओ सादर केला असून त्यामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा ऐकू येत नाहीत. त्यामुळे आता कोणता व्हिडिओ खरा आणि कोणता खोटा, हे पोलीस तपासातूनच सिद्ध होईल.

संपादकीय भूमिका

भाजपने प्रसारित केलेल्या व्हिडिओतील तथ्य समोर येईलच. तसेच काँग्रेसने आरोप फेटाळले असले, तरी काँग्रेसवाल्यांना पाकिस्तानप्रेमाचा उमाळा येणे, हा इतिहास राहिला आहे, हे सुज्ञ जनता जाणून आहे. भारतातून दक्षिण भारत वेगळे करण्याचा कट रचणारे राजकीय नेते हेसुद्धा काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे अशी घटना घडली असल्यास कुणाला आश्‍चर्य वाटू नये !