२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज, म्हणजेच कवीवर्य वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या निधनानंतर, म्हणजे वर्ष १९९९ मध्ये घेण्यात आला. मराठी भाषेचा गौरव, साहित्याचा सन्मान आदी उद्देशाने हा दिवस राज्यभर साजरा करण्यात येतो आणि या निमित्ताने विविध ठिकाणी भाषा, साहित्य, लेखक यांच्याविषयीचे विविध कार्यक्रम शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, या क्षेत्रांत काम करणार्या संस्था किंवा शासन यांच्या वतीने घेतले जातात. हल्ली बहुतांश वेळा हे कार्यक्रम काहीसे कृत्रिमरित्या साजरे होतात. ‘प्रत्यक्ष मराठी भाषेचे संरक्षण आणि संवर्धन या दृष्टीने यातून काही भरीव फलनिष्पत्ती निघाली’, असे होत नाही. वर्ष १९६० पासून अगदी १९९० पर्यंत मराठी साहित्य क्षेत्र एका विशिष्ट उंचीवर होते. ‘हा मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता’, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या काळात दूरदर्शनचा प्रभाव नव्हता आणि भ्रमणभाष तर नव्हताच. त्यामुळे लेखन, वाचन संस्कृतीचा परिपोष होण्यास मोठी संधी होती. त्यातून महाराष्ट्रासारख्या सर्व दृष्टींनी पुढारलेल्या शिक्षित शहरांच्या राज्यात मराठी साहित्यसंस्कृती फळली, फुलली. सर्व समाजाप्रमाणे पुढे याच साहित्यिकांची मुले इंग्रजी माध्यमात शिकू लागली. येथील साहित्य वाचणारी मध्यमवर्गीय सुशिक्षितांची पुढची पिढी विदेशी स्थायिक होऊ लागली किंवा पुरती इंग्रजाळली गेली. मराठी साहित्याला ज्या मराठीप्रेमी राजकारण्यांनी राजाश्रय दिला, त्या सर्व लोकप्रतिनिधींची मुले इंग्रजी माध्यमात शिकू लागली. त्यामुळे दुर्दैवाने आजच्या राजकारण्यांनाही ‘इंग्रजी ज्ञानभाषा असल्याने मुलांना इंग्रजी माध्यमात घालावे लागले, तरी घरी मराठी बोला’, असे सांगण्याविना समोर पर्याय दिसला नाही.
मराठी ज्ञानभाषा होऊ शकते !
कशी गंमत आहे पहा ! सार्या विश्वातील मूलभूत ज्ञान, अगदी विज्ञानासह असणारे ज्ञान, हे वेदांत आणि हिंदु धर्मग्रंथांत आहे. ही संस्कृत भाषा देवनागरीच असल्याने मराठीला अत्यंत जवळची आहे. वैदिक गणितही सर्वांत पुढारलेले आहे. असे असतांना आज विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या शाखा, अभियांत्रिकी आणि वैद्यक क्षेत्रांच्या विविध शाखा, प्रतिदिन नवीन शोध लागणारे संगणकीय तंत्रज्ञान, व्यवस्थापन, विज्ञानाच्या अन्य शाखा, खगोलशास्त्र इतकेच काय तर पर्यटन, पर्यावरण, उपाहारगृह, व्यवस्थापन, अर्थशास्त्र आदींचे ज्ञान मराठीत उपलब्ध नाही, अशी आतापर्यंतची तरी स्थिती होती किंवा आहे. शिक्षण, नोकरी, करिअर या दृष्टीने सोपे जाईल म्हणून मुलांना इंग्रजी माध्यमात घातले जाते. यामुळे मुलाला इंग्रजी भाषा बोलता येते; पण मराठी भाषेचे ‘संस्कार’ होत नाहीत. भाषेचे संस्कार हे वैचारिक समृद्धतेशी अर्थात् व्यक्तीमत्त्व घडण्याशी निगडित असतात. ते धर्म, संस्कृती, परंपरा यांविषयी अभिमान निर्माण करतात. ते एक माणूस म्हणून आणि देशाचा नागरिक म्हणून विद्यार्थ्याला घडवतात, उदाहरणार्थ मराठी भाषेचे संस्कार झाले, तर त्यात ज्ञानेश्वरांपासून रामदासस्वामींपर्यंत आणि छत्रपती शिवरायांपासून सावरकरांपर्यंत सर्व जण येतात. बहिणाबाईंपासून शांता शेळकेंपर्यंत आणि इरावती कर्वे, दुर्गा भागवत यांच्यापासून सुधा मूर्तींपर्यंत सर्व जणी येतात. त्यात खांडेकरांपासून अत्रे, ‘पुलं’ आणि ‘वपु’ही येतात अन् रणजित देसाई, विश्वास पाटील यांच्यापासून अरुण साधूंपर्यंत अनेक जण येतात. विदेशी भाषेत विचार करण्याची मर्यादा आणि शब्दमर्यादा आदींमुळे इंग्रजी माध्यमातील मुले चांगला ‘निबंध’ लिहू शकत नाहीत, असे लक्षात येते. अर्थात् एखाद्याने नैपुण्य प्राप्त करून परकीय भाषा कितीही फुलवली, तरी तिचे भाषासौंदर्य कळायला आणि त्यातील आनंद घ्यायला इथे ती किती जणांना लक्षात येणार आहे ? वर्ष २०२२ मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मराठी भाषेत भाषांतरीत केलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ९ आणि पदविका अभ्यासक्रमाच्या ११ पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. वर्ष २०२० मध्ये मातृभाषेत नवीन शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले आहे. मातृभाषेतून विद्यार्थ्यांना सर्व तांत्रिक शिक्षण मिळाले, तर त्यांना विषय लवकर समजेल आणि त्यातून त्यांना नवीन कल्पकता सुचेल, त्यातून संशोधननिर्मिती होईल, पेटंट मिळवता येतील, आत्मविश्वास वाढेल हे सर्व उद्देश या धोरणामागे आहेत. शासनाचा उद्देश खरे तर चांगला आहे; परंतु आता इंग्रजीचा घट्ट पगडा आपल्या डोक्यावर बसला आहे. पैसे मिळवण्याच्या आणि इंग्रजी बोलण्याच्या प्रतिमेच्या स्पर्धेत पाल्याला टिकवून ठेवण्याचे ध्येय घेतलेले आजचे किती पालक मुलांना मराठी माध्यमात घालायला सिद्ध होतील ? हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नाही. मागील वर्षी मुंबईतील सहस्रांहून अधिक पालकांनी त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमात घातले. अशा प्रकारच्या मोहिमांचे सार्वत्रिकीकरण झाले, तर कदाचित् परत एकदा मातृभाषेतून शिक्षण देण्याची नवरूढी येऊन मराठीला पुनश्च चांगले दिवस येऊही शकतील. जो विद्यार्थी मुळात हुशार असतो, त्याला भाषेची अडचण अल्प येते; मात्र बुद्धीने बेताचे असणार्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामुळे उलटी अडचण येऊन त्यांच्या बुद्धीचा विकास खुंटण्याचीही दाट शक्यता असते.
मराठीप्रेमींनो, ठोस उपाययोजनांवर भर द्या !
विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थ या सर्व विषयांची मराठीत चर्चा करणे, मराठीत यावर पुस्तके येणे, यातील संकल्पनांसाठी चपखल असे प्रतिशब्द शोधणे आणि ते दैनंदिन जीवनात आग्रहपूर्वक वापरणे, ही काळाची आवश्यकता आहे. याची पुस्तके तज्ञांकडून सिद्ध करून शासनाने त्यांचे अल्प किमतीत किंवा विनामूल्य वितरण केले पाहिजे. मराठीचा वापर वाढण्यासाठी शासनाने ठोस ध्येय ठरवून ते गाठण्याच्या परिणामकारक उपाययोजना, समयमर्यादा घालून केल्या पाहिजेत. त्यांचा आढावा घेतला पाहिजे. आई-वडील आणि शिक्षक यांनी मुलांशी बोलतांना कटाक्षाने मराठी शब्द आवर्जून वापरणे, हे त्यांचे आद्यकर्तव्य समजले पाहिजे. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका या इंग्रजी भाषा आणि संस्कृती यांचा परिपोष असतात. खेड्या-पाड्यांतील अल्पशिक्षितही चुकीचे इंग्रजी उच्चार करतात; पण इंग्रजी शब्द वापरतात. पाट्या आणि अर्ज हे मराठीत हवेतच; पण त्याचसमवेत मराठी माणसाने घरात, चारचौघात, समाजात, बाजारात, दुकानदार, रिक्शावाले, भाजीवाले या सार्यांशी पूर्णवेळ आवर्जून मराठीत बोलले पाहिजे. अडीच सहस्र वर्षे जुन्या आणि ३०० हून अधिक बोलीभाषा बोलल्या जाणार्या मायमराठीला जगातील १० व्या क्रमांकाच्या भाषिकसंख्येवरून अधिकाधिक वरच्या क्रमांकाला नेण्याचे ध्येय प्रत्येक मराठीप्रेमीने धरले, तर येता काळ ‘मराठी’चा होईल !
दैनंदिन व्यवहारात कटाक्षाने मराठी शब्दांचा वापर केला, तर मराठी भाषिकांकडून मराठीचा मान राखला जाईल ! |