विधान परिषद २ वेळा तहकूब, विरोधी पक्षांचा सभात्याग
मुंबई – मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे सहकारी बारसकर, संगीता वानखेडे यांनी आरोप केले आहेत. त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर ‘बामणी कावा’ अशी टीका केली आहे, तसेच अन्यही बेछूट टीका केली आहे. एका लोकप्रतिनिधीच्या कारखान्यात याविषयी नियोजन झाले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची एस्.आय.टी. चौकशी झाली पाहिजे. जरांगे पाटील यांच्या मोठमोठ्या सभा झाल्या. या सभा, ट्रॅक्टर यांसाठी पैसा कुठून आला ? कुणी पैसे दिले. यांची ‘ईडी’च्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या वेळी विषय मांडतांना केली. या वेळी प्रवीण दरेकर यांच्या म्हणण्याला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गोंधळ निर्माण झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकदा हौदात येऊन घोषणा दिल्या. त्यामुळे सभापती नीलम गोर्हे यांनी सभागृह प्रथम १० मिनिटे आणि नंतर ५ मिनिटांसाठी तहकूब केले. प्रवीण दरेकर त्यांच्या निवेदनात लोकप्रतिनिधींची नावे घेत आहेत, हे चुकीचे आहे, असे सांगत आणि सरकारचा धिक्कार करत काही वेळासाठी सभात्याग केला.
प्रवीण दरेकर म्हणाले की, जरांगे यांच्या सहकारी संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्यावर आरोप केले. बारसकर महाराज यांनी जरांगे यांच्याविषयी जे काही सांगितले, ते खरे आहे. जरांगे कुणालाही विश्वासात घेत नव्हते, केवळ एक दूरभाष यायचा, तो दूरभाष शरद पवार यांचाच होता. या आंदोलनाचा खर्च शरद पवार यांनीच केला आहे, हे सत्य बाहेर येईल. संगीता वानखेडे यांच्या या आरोपांची शासन चौकशी करणार का ?
मनोज जरांगे यांनी विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. त्याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांची नावे घेतली, त्या सर्वांची चौकशी केली पाहिजे. नारायण राणे यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या अवमानाच्या प्रकरणी कारवाई करून त्यांना अटक झाली, तशीच अटक जरांगे पाटील यांना करणार का ?