मराठी भाषेचा विकास हे व्यक्ती आणि समाज यांचे दायित्व ! – मकरंद मुळे

पत्रकार मकरंद मुळे

नवी मुंबई – मराठी भाषेचे जतन करून ती पुढच्या पिढीत रुजवण्याचे काम प्रत्येकाने आपले घरचे कार्य मानून करण्याची आवश्यकता आहे, असे ‘पु.ल. देशपांडे कला अकादमी’चे सदस्य आणि पत्रकार मकरंद मुळे यांनी वाशी येथे केले. अप्पा जोशी प्रतिष्ठान, नवी मुंबई साहित्य परिषद आणि अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. वाशी येथील योग्य विद्या निकेतनच्या सभागृहात ‘मराठी भाषा विकास’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार, कवी दुर्गेश सोनार हे होते. या वेळी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रसारक आणि मराठी साहित्य संस्कृती कला मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र नेने, ‘अप्पा जोशी प्रतिष्ठान’चे संस्थापक डॉ. नंदकिशोर जोशी, साहित्य परिषदेच्या सदस्या डॉ. अरुंधती जोशी कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

मकरंद मुळे म्हणाले की, मराठीविषयी चिंता व्यक्त करणार्‍या विद्यमान प्रस्थापित व्यवस्था मराठी भाषेचा विकास करण्यात फारशा यशस्वी होतांना दिसत नाहीत. या व्यवस्था मराठी भाषेच्या आधारे स्वतःचे महत्त्व वाढवण्यात मग्न आहेत. मराठी भाषेचा विकास चिंतेने नव्हे, तर मूलभूत चिंतनाने होईल. मराठी भाषा संवर्धनाची केवळ उक्ती पुरेशी नसून त्याला विवेकी कृतीची जोड देणे आवश्यक आहे. मराठीचा जातीय, पक्षीय राजकारणासाठी होणारा वापर ही चिंतेची गोष्ट आहे. भाषिक अस्मितेच्या टोकाच्या भूमिकेतून भाषा संकोच होण्याचा धोका संभवतो. भाषा वापर आणि प्रसार करतांना आग्रह आणि हट्ट यातील भेद लक्षात घेतला पाहिजे. स्वाभिमान आणि अहंकार यातील रेषा अस्पष्ट असते, ती समजून घेऊन मराठी भाषेचा विकास केला पाहिजे.

मराठी भाषा, भाषिक संपतील अशी भीती दाखवून मराठी भाषेचा विकास होणार नाही. विचार, पक्ष, झेंडा, नेता याचा आधार न घेता प्रत्येकाने आपले दायित्व मानून आपुलकीने मराठी भाषा विकासाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे.   आपल्यापासून आरंभ केला पाहिजे. नियमितपणे पुस्तकवाचन, पुस्तकसंग्रह, मराठी साहित्यावर घरात चर्चा करणे, प्रतिदिन दैनंदिनी लिहिणे, आपल्या परिसरात होणार्‍या मराठी साहित्य, संस्कृतीच्या उपक्रमात सहभागी होणे, रोजच्या व्यवहारात मराठीचा वापर करणे आणि आपल्या भावविश्वात असलेले मराठीपण टिकून राहील, ते वृद्धिंगत होईल, याला प्राधान्य देणे अशा छोट्या छोट्या कृतींतून मराठी भाषेचा विकास होईल.