‘आशा’ स्वयंसेवकाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार (डावीकडे) उपमुख्यमंत्री अजित पवार (उजवीकडे)

मुंबई – सरकार आशा स्वयंसेविकांच्या पाठीशी आहे. आपण सकारात्मक राहून चर्चा करूया; परंतु ‘असेच झाले पाहिजे’ असा आग्रह नको. काही जण मागण्यांवर अडून रहातात. आर्थिक सूत्रे येतात, तेव्हा त्यामुळे परिणाम होणार्‍या अनेक गोष्टी पहाव्या लागतात. दोघांनी थोडे पुढे-मागे सरले पाहिजे. चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केले. ते २६ फेब्रुवारी म्हणजे ‘अर्थसंकल्पीय अधिवेशना’च्या पहिल्या दिवशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘औचित्याचे सूत्र’ म्हणून ‘आशा स्वयंसेविकांची माहिती सभागृहाला दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ‘अर्थसंकल्पीय अधिवेशना’च्या पहिल्या दिवशी महत्त्वाची विधेयके मांडली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि राजेंद्र पाटणी यांच्या दु:खद निधनानंतर शोक प्रस्ताव संमत करून सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले. सरकारकडून ८ सहस्र ६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या या वेळी सादर करण्यात आल्या.

काय म्हणाले विरोधी पक्षनेते वडेट्टीवार ?

काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार सभागृहात म्हणाले, ‘‘गेले दीड मास आझाद मैदानावर आशा स्वयंसेविका उपोषण करत आहेत. मंत्रिमंडळांमध्ये ‘आशा स्वयंसेविकांना ७ सहस्र रुपये वाढ देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु ती वाढ केव्हा मिळणार ? ती वाढ सरकार का देत नाही ? त्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.