सोलापूर येथील सौ. स्वाती सोळंके यांनी समष्टी सेवा करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

सौ. स्वाती सोळंके

१. गुरुकृपेने समष्टी सेवेची संधी मिळणे

‘मला घरातून साधनेला विरोध आहे. त्यामुळे मला समष्टी सेवा करता येत नव्हती. त्यासाठी माझ्याकडून गुरुदेवांना सतत प्रार्थना व्हायची. गुरुदेवांच्या कृपेने मला सोलापूर सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ साधना करण्याची संधी मिळाली. मी सोलापूर सेवाकेंद्रात आल्यानंतर तिथून मी सेवेसाठी लातूर येथे जाते.

२. गुरुदेवांच्या कृपेने सोलापूर सेवाकेंद्रात राहिल्यावर धाकट्या मुलीचा बालदम्याचा त्रास न्यून होणे आणि ‘दोन्ही मुलींची काळजी गुरुदेव घेत आहेत’, या जाणिवेने गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे

माझ्या दोन्ही मुली सोलापूर सेवाकेंद्रात रहात आहेत. माझी छोटी मुलगी १० वर्षांची असून मी तिला सोडून कधी राहिले नव्हते. तिला बालदम्याचा त्रास आहे. ती अधूनमधून मला दूरभाष करून विचारायची, ‘‘आई, तू कधी येणार आहेस ?’’ त्यामुळे मला तिची काळजी वाटून माझ्या मनात तिच्याविषयी सारखे विचार यायचे. तेव्हा ‘श्री गुरुच तिची काळजी घेत आहेत’, असा भाव ठेवून मी माझी सेवा चालू ठेवली. त्यानंतर काही दिवसांतच गुरुदेवांच्या कृपेने मुलीचा बालदम्याचा त्रास न्यून झाला. त्यामुळे माझ्या मनात तिच्याविषयी असलेली चिंता आणि काळजी न्यून झाली. माझ्या दोन्हीही मुलींची काळजी गुरुदेव घेत असल्याने मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

३. गुरुदेवांना केलेल्या प्रार्थनेमुळे समष्टीत बोलता येणे

पूर्वी घरातील वातावरणामुळे माझे घरातून कधी बाहेर जाणेच होत नव्हते. त्यामुळे मला ४ व्यक्तींसमोर बोलायचीही सवय नव्हती. त्यामुळे मला समाजात जाऊन प्रवचने घेणे, सत्संग घेणे इत्यादी जमत नव्हते; पण मला समष्टी सेवा करायची तीव्र तळमळ असल्यामुळे मी गुरुदेवांना सारखी प्रार्थना करत होते, ‘गुरुदेव, मला प्रचार करायला शिकवा. तुम्हीच माझ्याकडून सेवा करून घ्या. मला धाडस द्या. माझा आत्मविश्वास वाढवा.’ अशा प्रार्थना केल्यानंतर आता मी बैठका आणि प्रवचनेही घेऊ शकत आहे. आता मी अर्धा घंटा लोकांसमोर बोलू शकत आहे.

‘गुरुदेव, मला काहीच येत नाही’, तरी ‘सर्व कसे होत आहे’, हे मलाच कळत नाही. ‘मला सर्व काही शिकवून गुरुदेव माझ्याकडून समष्टी सेवा करून घेत आहेत आणि मला साधनेत पुढे पुढे घेऊन जात आहेत’, यासाठी मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

– सौ. स्वाती सोळंके, सोलापूर सेवाकेंद्र (२१.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक