पाकिस्तानमध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांकडून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न !

कपड्यांवर कुराणातील आयते लिहिल्याने ईशनिंदा केल्याचा आरोप !

लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका महिलेला जमावाने ठार  मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या कपड्यांवर काही अरबी शब्द लिहिलेले होते. इस्लामी कट्टरवाद्यांना हे शब्द कुराणातील आयते असल्याचे वाटले. ‘ही इस्लाम धर्माची निंदा आहे. महिलेने ईशनिंदा केली आहे’, असे म्हणत जमावाने तिला घेराव घातला, तसेच तिला कुर्ता काढायला सांगत तिला शिवीगाळ केली आणि तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी जमावाने महिलेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. पोलीस उपअधीक्षक सय्यदा शहाराबानो नक्वी यांनी महिलेला जमावापासून वाचवले.

सौजन्य न्यूज 18 इंडिया 

महिलेने क्षमा मागितली !

पोलीस उपअधीक्षक सय्यदा यांनी सांगितले की, महिलेने परिधान केलेल्या कपड्यांवर साधे अरबी शब्द होते. त्यात कुराणातील आयते लिहिलेले नव्हते; मात्र प्रकरण शांत झाल्यानंतर पीडित महिलेने मौलवींसमोर क्षमा मागितली. पंजाब प्रांताचे पोलीस महानिरीक्षक डॉ. उस्मान अन्वर यांनी महिलेला वाचवल्याविषयी पोलीस उपअधीक्षक सय्यदा यांचे कौतुक केले. या कामासाठी पंजाब पोलिसांनी प्रतिष्ठित ‘कायदे-ए-आझम’ या पोलीस पदकासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. पाकिस्तानच्या पोलीस खात्यातील हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.