युक्रेनने ३१ सहस्र सैनिक गमावले ! – व्लोदिमिर झेलेंस्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन

रशिया-युक्रेन युद्धाला २ वर्षे पूर्ण !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

कीव्ह (युक्रेन) – रशिया-युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी या दिवशी २ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे युद्ध २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी चालू झाले होते. या २ वर्षांच्या युद्धात दोन्ही देशांची बरीच हानी झाली आहे. या युद्धामुळे सहस्रावधी लोकांचे प्राण घेतले, लाखो लोक विस्थापित झाले, तर कुटुंबे आणि समुदाय तुटले आहेत अन् अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. हे रक्तरंजित युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की म्हणाले, ‘‘रशियाच्या आक्रमणानंतर आम्ही आमचे ३१ सहस्र सैनिक गमावले आहेत.’’

सौजन्य वन इंडिया न्यूज 

रशिया युक्रेनवर किती नियंत्रण मिळवू शकला ?

अमेरिकास्थित ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर (आय.एस्.डब्ल्यू.)’ ने अहवाल दिला आहे की, रशियाने सध्या युक्रेनचा १८ टक्के भूभाग व्यापला आहे. रशियन सैन्याने सध्या डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया, खेरसन आणि काही प्रमाणात खार्किव कह्यात घेतले आहे.

पुतिन यांची युद्धबंदीची सूचना अमेरिकेने फेटाळली !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे युक्रेन-रशिया संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत होते; परंतु ते रशियाच्या कह्यातील युक्रेनची भूमी सोडण्यास सिद्ध नव्हते. त्याच वेळी अमेरिकेने मध्यस्थांद्वारे रशियाला सांगितले की, युक्रेनच्या उपस्थितीखेरीज युद्धविरामावर चर्चा करणार नाही. याविषयी संबंधित सूत्रांनी सांगितले की, अमेरिका युक्रेनवर दबाव आणू इच्छित नाही. त्यामुळे चर्चेचे प्रयत्न अयशस्वी झाले.