कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका पडताळणीवरील बहिष्कार मागे !

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत चर्चा

मुंबई – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या पदाधिकार्‍यांसमवेत २५ फेब्रुवारी या दिवशी बैठक घेतली. या वेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षक संघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यात आयटी आणि इतर शिक्षकांचे समायोजन, १२ आणि २४ वर्षांनंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षांनंतर २० टक्क्यांप्रमाणे दिल्या जाणार्‍या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, याचप्रमाणे काही दीर्घकालीन मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. यांपैकी वित्त विभागाशी संबंधित असलेल्या मागण्यांचे प्रस्ताव वित्त विभागाकडे दिले जाणार आहेत. तर, दीर्घकालीन मागण्यांबाबत शासन स्तरावर स्थापन समिती निर्णय घेणार आहे. समिती जे निर्णय घेईल ते सर्वांनाच लागू असतील.

आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होत असतो, यामुळे शिक्षकांचे जवळजवळ सर्वच प्रश्न वर्षांमध्ये सोडवण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर शिक्षकभरती, टप्पा अनुदान लागू करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. टप्पा अनुदानाचा सर्वाधिक निधी कनिष्ठ महाविद्यालयाला देण्यात येत आहे, असे केसरकर यांनी पुढे सांगितले.