सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय तळमळीने करून तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणारी कु. अवनी छत्रे (वय २४ वर्षे) !

‘काही दिवसांपूर्वी मला सूक्ष्म परीक्षण करणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख भेटले होते. माझी मोठी कन्या कु. अवनीला वाईट शक्तींचा होणारा तीव्र त्रास गुरुकृपेमुळे अल्पावधीत मध्यम स्तरावर आला आहे. याविषयी निषाद यांनी मला लिहून देण्यास सांगितले होते. माघ कृष्ण द्वितीया (२६.२.२०२४) या दिवशी कु. अवनीचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मला तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. अवनी दीपक छत्रे हिला २४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कु. अवनी छत्रे

१. प्रामाणिकपणा

‘कु. अवनी सर्वांशी प्रामाणिकपणे वागते. तिला खोटेपणाने वागणे न पटल्यामुळे तिचे इतरांशी वादही होतात.

. जवळीक करणे 

ती तिला सांगितलेले काम पूर्ण करते आणि शक्य असल्यास इतरांना साहाय्यही करते. यातून ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपलेसे करते.

३. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे

अ. ती बर्‍याच प्रसंगात आम्हा दोघांना (मला आणि तिच्या आईला) ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषावर मात करण्यास सांगते आणि नामजपादी उपाय करण्याची आठवण करून देते.

आ. अवनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जाण्यापूर्वी स्वरक्षण प्रशिक्षक म्हणून सेवा करत होती. तिच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळेच माझी धाकटी मुलगी (कु. सुरभी छत्रे (वय १९ वर्षे)) स्वरक्षण प्रशिक्षक म्हणून सेवा करत आहे.

४. निर्भिडपणा 

रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करायला जाण्यापूर्वी एकदा अवनीने सनातन संस्थेविषयी चुकीचे बोलणार्‍या एका व्यावसायिकाला सडेतोड उत्तर दिले होते.

५. अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास होणे; पण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय तळमळीने केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अवनीचे त्रास न्यून होणे 

५ अ. अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे अवनीचे स्वभावदोष उफाळून येत असणे, त्यामुळे तिची काळजी वाटणे : अवनीमध्ये ‘उतावळेपणा, अनावश्यक बोलणे, आग्रही भूमिका असणे’, असे स्वभावदोष आहेत. या स्वभावदोषांमुळे तिची पुष्कळ चिडचिड होते. रामनाथी आश्रमात गेल्यावर आश्रमातील चैतन्यामुळे तिचे स्वभावदोष उफाळून येण्याचे प्रमाण वाढले. तेव्हा ‘अनिष्ट शक्तींच्या तीव्र त्रासांमुळे तिचे स्वभावदोष उफाळून येतात’, हे आम्हाला समजले. यामुळे आम्हाला तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली.

५ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय तळमळीने केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अवनीचे त्रास न्यून होणे : अवनी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (टीप) करीत होती; पण तिला होणार्‍या अनिष्ट शक्तींच्या तीव्र त्रासामुळे अवनीला ‘आश्रमात राहू नये’, असे वाटत होते. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी तिच्यासाठी नामजपादी उपाय सांगितले. आम्ही कुटुंबियांनीही तिला समजावून सांगितले, ‘आश्रमात तू सुरक्षाकवचात आहेस. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय यामुळे तुझे त्रास लवकर न्यून होतील.’ तिने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय  तळमळीने केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अल्पावधीत तिचे त्रास न्यून झाले. गुरुकृपा, संतांचा चैतन्यमय सहवास आणि मार्गदर्शन अन् साधकांच्या शुभेच्छा यांचा तिला लाभ झाला.

६. कृतज्ञता 

‘श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ।।’ (संत ज्ञानेश्वर महाराज), म्हणजे ‘स्वतः सद्गुरु आपल्या पाठीशी असतांना अन्य गोष्टींची पर्वा कोण करेल ?’  या उक्तीप्रमाणे गुरुकृपेने अवनीचे तीव्र त्रास मध्यम स्तरावर आले. आता ती आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. सर्वात्मक सर्वेश्वर परम पूज्यांचे आमच्यावरचे हे ऋण जन्मोजन्मी न फिटणारे आहेत.

७. प्रार्थना

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सर्व साधकांकडून त्यांना अपेक्षित अशी साधना करून घ्यावी’, अशी त्यांच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, फोंडा, गोवा. (१२.२.२०२४)

  • टीप – स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्या कुठल्या स्वभावदोषामुळे झाल्या, ते लिहिणे. ‘तशी चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी त्यापुढे योग्य दृष्टीकोनाची सूचना लिहून दिवसभरात १० – १२ वेळा मनाला ती सूचना देणे
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक