देशविदेशातील भाविकांना अध्यात्माची अनुभूती देणारे माणगाव, कुडाळ येथील टेंब्येस्वामींचे जन्मस्थान !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे वर्ष १८५४ मध्ये परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी यांचा जन्म झाला आणि वर्ष १९१४ मध्ये त्यांनी देहत्याग केला. ‘श्रीक्षेत्र माणगाव’ हे क्षेत्र परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुजरातमधील गरुडेश्वर येथे वर्ष १९१४ मध्ये टेंब्येस्वामींनी समाधी घेतली. या ठिकाणी स्वामींचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. स्वामींनी चालू केलेले नित्य कार्यक्रम आजही नियमितपणे चालू आहेत. महाराष्ट्रासह देशविदेशातील भाविक या ठिकाणी येतात आणि येथील जागृत स्थानाचा आध्यात्मिक लाभ प्राप्त करतात.

संकलक : श्री. दीपक साधले, सचिव, दत्त मंदिर न्यास संस्था, माणगाव (कुडाळ)

परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी

१. टेंब्येस्वामींच्या पदभ्रमणामुळे भाविक जोडले जाणे !

टेंब्येस्वामी यांनी संपूर्ण भारतात पायी प्रवास केला. हिमाचल ते कन्याकुमारीपर्यंत ते पायी भ्रमण करत. या कालावधीत स्वामींनी २३ ठिकाणी चातुर्मास केले. स्वामींचे वास्तव्य ज्या ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणचे अनेक जण स्वामींशी जोडले गेले. स्वामींच्या पदभ्रमणामुळे देशभरात अनेक भक्तगण त्यांच्याशी जोडले गेले. स्वामी ज्या ज्या ठिकाणी राहिले, त्या बहुतांश ठिकाणी अध्यात्माचे कार्य चालू आहे. या विविध ठिकाणांहून भाविक येथे दर्शनासाठी येतात.

२. दत्तगुरुंच्या कृपेने स्वामींचा जन्म आणि दत्तमंदिराची उभारणी !

टेंब्येस्वामी यांच्या वडिलांनी गाणगापूर येथे १२ वर्षे तपश्चर्या केली आणि त्यानंतर संसाराला प्रारंभ केला. साधनेमुळे आणि दत्तमहाराजांच्या कृपेमुळे त्यांच्या पोटी टेंब्येस्वामी जन्माला आले. टेंब्येस्वामी यांना दत्तप्रभु यांचा ४ था अवतार मानले जाते. स्वामी माणगाव येथून श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीपर्यंत पायी भ्रमण करायचे. अशाच प्रकारे एकदा प्रवास करतांना श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी येथे त्यांना कागल येथील एका मूर्तीकाराने दत्तगुरुंची मूर्ती भेट दिली. येथे छोटेसे मंदिर बांधण्यासाठी माणगाव येथील महिलेने त्यांना भूमी दिली. त्यानंतर स्वामींनी माणगाव येथे छोटे मंदिर बांधून दत्तमूर्तीची स्थापना केली. वर्ष १९३८ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नातसून इंदिराराणी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. इंदिराराणी यांनी आजूबाजूची भूमी विकत घेऊन ती मंदिरासाठी दान दिली. यामध्ये भाविकांसाठीच्या प्रसादालयासाठीही त्यांनी भूमी दिली.

परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी मंदिर

३. इंदिराराणी राज्ञी होण्याची स्वामींची भविष्यवाणी !

इंदिराराणी होळकर यांच्या विवाहापूर्वी स्वामींनी त्यांच्या जीवनात ‘राज्ञीपद’ म्हणजे राणी होण्याचा योग असल्याचे सांगितले होते. पुढे तुकोजी होळकर यांच्याशी त्यांचा विवाह होऊन इंदिराराणी या ‘महाराणी’ झाल्या. विवाहानंतर इंदिराराणी प्रतिवर्षी माणगाव येथील मंदिरात दर्शनाला यायच्या. इंदिराराणी होळकर यांनी स्थापन केलेल्या प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज यांच्या योगचिन्हांकित पादुकाही या ठिकाणी आहेत.

श्री. दीपक साधले

४. भाविकांना सेवेची संधी उपलब्ध करून देणे !

काही भक्त बाहेरगावाहून मंदिरात सेवेसाठी येतात. काही भक्त १५ दिवस ते १ मासही सेवेसाठी थांबतात. अशा भक्तांची रहाण्याची सोय भक्तनिवासामध्ये करण्यात येते. अशा भाविकांची नाममात्र सेवाशुल्क आकारून भक्तनिवासात रहाण्याची व्यवस्था करण्यात येते. यासह जेव्हा मंदिरात सेवेकर्‍यांची आवश्यकता असते, विशेषत: उत्सवाच्या कालावधीत आजूबाजूच्या गावांतील भक्तगण सेवेसाठी मंदिरात येतात.

५. मंदिरातील नित्य कार्यक्रम !

पहाटे ५.३० वाजता मंदिर उघडते. ५.४५ वाजता काकड आरती होते. त्यानंतर भाविकांसाठी चहाची व्यवस्था करण्यात येते. सकाळी ७ ते १०.३० या वेळेत आवर्तने, अभिषेक आदी धार्मिक विधी होतात. सकाळी १०.३० ते दुपारी १२ या वेळेत महापूजा, दुपारी १२ ते १२.३० या वेळेत आरती आणि महानैवेद्य, दुपारी १ ते ३ या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. त्यानंतर नामस्मरण, भजन, गायन आदी कार्यक्रम होतात. सायंकाळी ७ वाजता आरती, स्वामींची पंचपदी म्हटली जाते. रात्री ९ वाजता शेजारती होते.

६. भाविकांसाठी वर्षभर महाप्रसादाची व्यवस्था !

मंदिरामध्ये वर्षातील ३६५ दिवस दुपारी आणि रात्री २ वेळा महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. नियमित शेकडो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. ज्या भक्तगणांना आणि श्रद्धाळू लोकांना भाविकांना महाप्रसाद द्यायचा आहे, ते न्यासाकडे नावनोंदणी करतात. भाविक यासाठी धन किंवा धान्य स्वरूपात अर्पण करतात. मंदिराच्या वतीने भाविकांना महाप्रसाद दिला जातो.

७. भाविकांना अध्यात्माशी जोडण्याचे महत्कार्य !

स्वामींनी मंदिरामध्ये नित्य धार्मिक विधी चालू केले. त्यानुसार आजही पूजा-अर्चा चालू आहे. मंदिर न्यासाकडून मंदिरात कायमस्वरूपी २ पुजार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाविकांना स्वामींच्या अध्यात्मविषयक ग्रंथसंपदेचा लाभ व्हावा, यासाठी मंदिराच्या परिसरात धार्मिक ग्रंथांसह उपासनेसाठी आवश्यक विविध वस्तू योग्य दरामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये व्यावसायिकरणाचा भाग नसून भाविकांना साधनेसाठी साहाय्य करण्याचा उद्देश आहे. प्रत्येक पौर्णिमेला मंदिरात सामूहिक नामस्मरणाचे आयोजन केले जाते. प्रत्येक गुरुवारी मंदिरात आरतीसाठीही मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात.

८. भाविकांसाठी अत्यल्प दरात निवासाची सुविधा !

मंदिराजवळ आणि स्वामींचे जन्मस्थळ अशा २ ठिकाणी दत्त मंदिर न्यास संस्थेचे भक्तनिवास आहेत. दोन्ही मिळून भक्तनिवासाच्या ३६ खोल्या आहेत. यासह मंदिराच्या जवळ आणखी एका भक्तनिवास उभारण्यात येणार आहे. नुकतीच या भक्तनिवासाची पायाभरणी झाली असून येत्या वर्षभरात भक्तनिवासाची इमारत पूर्ण होईल.

९. भाविकांनी आरतीसाठी ‘ऑनलाईन’ जोडणे !

मंदिरात होणारी आरती, तसेच मंदिरात होणारे विविध धार्मिक विधी यांचे ऑनलाईन प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे नियमितच्या आरतीलाही अनेक भाविक ऑनलाईन जोडतात. यामुळे देशविदेशातील भाविकांना प्रत्यक्ष मंदिरात येता आले नाही, तरी त्यांना या धार्मिक विधींचा ‘ऑनलाईन’ लाभ घेता येतो.

१०. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वामींच्या मठात वास्तव्य !

गुजरातमधील माजी पंतप्रधान वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथून काही किलोमीटर अंतरावर स्वामींचे समाधीस्थान आहे. वर्ष १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात गुजरातमधील स्वामींच्या समाधीस्थळी असलेल्या आश्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ३ मास वास्तव्य केले होते, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडून आम्हाला समजली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही स्वामींच्या समाधीस्थळी येऊन गेले आहेत.