टेंब्येस्वामींच्या अध्यात्मकार्याचा वसा समर्थपणे चालवणारी माणगाव येथील दत्त मंदिर न्यास संस्था !

अनेक उच्च पातळीच्या संतविभूती प्रसवल्यामुळे ‘संतभूमी’ अशी महाराष्ट्राची ओळख आहे. त्यांतीलच एक संतरत्न म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज ! टेंब्येस्वामींनी देह ठेवून एका शतकाहून अधिक काळ लोटला आहे; मात्र त्यांच्या भक्तगणांकडून त्यांचा अध्यात्मकार्याच्या प्रसाराचा वसा अत्यंत सेवाभावी वृत्तीने चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्त मंदिर न्यास संस्थेकडून हे कार्य अविरतपणे चालू आहे. शहराच्या मुख्य भागापासून दूरवर असूनही, तसेच प्रसिद्धीच्या झोतात नसूनही या तीर्थक्षेत्री नियमित शेकडो भक्तगण येतात. अध्यात्मप्रसारासमवेतच मंदिराचे सुव्यवस्थापन, भाविकांसाठी विविध सुविधांचे नियोजन, अर्पणाचा योग्य प्रकारे विनियोग आणि महत्त्वाचे म्हणजे भाविकांना सेवा उपलब्ध करून त्यांच्यामध्ये उपासनेची गोडी निर्माण करण्याचे महत्कार्य या संस्थेकडून ३६५ दिवस चालू आहे. एक छोटेसे देवस्थान असूनही या न्यासाची कार्यकुशलता आणि सेवाभावीपणा महाराष्ट्रातील सर्वच देवस्थानांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. या लेखाच्या माध्यमातून हे कार्य जाणून घेऊया !

संकलक : श्री. संजय जोशी, कुडाळ, सिंधुदुर्ग.

परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज

१. मंदिराजवळील विहिरीचे जल ‘तीर्थ’ म्हणून प्राशन करणे !

या मंदिराच्या बाहेरच एक विहीर आहे. ही विहीर टेंब्येस्वामी असल्यापासूनची आहे. स्वामीही याच विहिरीचे जल प्राशन करत असत. स्वामींच्या हस्तस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्यामुळे या विहिरीविषयी भाविकांचा भाव आहे. या विहिरीतील ‘जल’ तीर्थ म्हणून भाविक प्राशन करतात. ‘विहिरीतील जलामुळे विविध विकार बरे होतात’, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या विहिरीतील जलानेच नियमितपणे मंदिरातील स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घातला जातो. भाविकांसाठी नियमित बनवण्यात येणार्‍या महाप्रसादासाठीही याच विहिरीतील जल वापरण्यात येते.

२. गर्दी टाळण्यासाठी दर्शनार्थींची भुयारीमार्गातून व्यवस्था !

अनेकदा भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे मंदिरांचा परिसर भरून जातो. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये ही अडचण येते. ही गर्दी टाळण्यासाठी टेंब्येस्वामींच्या मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेरील सभामंडपाच्या एका टोकापासून मंदिराच्या गर्भगृहाच्या जवळपर्यंत भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी, तसेच उत्सवाच्या वेळी मंदिरात जाण्यासाठी भुयारी मार्गाचा उपयोग केला जातो. त्यामुळे उत्सवाच्या काळात मंदिराबाहेर गर्दी होत नाही. महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध मंदिरांमध्येही अशा प्रकारची व्यवस्था केल्यास मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळता येईल आणि सुव्यवस्थापनाच्या दृष्टीनेही चांगले ठरेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्त मंदिर न्यास
श्री. संजय जोशी

३. मंदिराची सात्त्विकता टिकण्यासाठी प्रयत्न करणारे सेवेकरी !

दत्त मंदिरात प्रतिदिन महाप्रसाद दिला जातो. सध्याच्या भ्रमणभाषच्या काळात काही जण महाप्रसाद घेतांनाही भ्रमणभाषवर बोलत असतात. अशा वेळी येथे महाप्रसाद वाढणारे सेवेकरी भाविकांना जाणीव करून देतात की, महाप्रसाद घ्या आणि नंतर भ्रमणभाषवर बोला. एकाच वेळी अनेक जण भ्रमणभाषवर बोलत महाप्रसाद घेऊ लागले, तर वातावरणात पालट होतो. त्याऐवजी शांत चित्ताने महाप्रसाद घ्यावा, असा सेवेकर्‍यांचा मानस असल्याचे आणि त्यायोगे येथील सात्त्विकता टिकवण्याकडे त्यांचा कल असल्याचे लक्षात येते.

४. महाप्रसादाच्या सेवेतील सुव्यवस्थापन !

मंदिरामध्ये नियमितचे कर्मचारी आणि सेवेसाठी येणारे भाविक यांच्यामध्ये सेवाभाव दिसून येतो. मंदिरात महाप्रसाद वाढणारे भाविक दत्तगुरूंचा प्रसाद म्हणून महाप्रसाद वाढतात. या वेळी कुणाकडून अन्न वाया जाणार नाही, याचीही काळजी सेवेकरी घेतात. मंदिराच्या प्रसादालयात भाविक महाप्रसादाला येतात, तेव्हा त्यांची रांग करणे, त्यांना ‘कूपन’ देणे, त्यांना एका बाजूने सलग बसायला सांगणे, महाप्रसाद झाल्यानंतर ताट, वाट्या, ग्लास यांचे वर्गीकरण करणे आदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुव्यवस्थापन दिसून येते.

न्यासाच्या विश्वस्तांमध्ये संघभाव आहे. कर्मचारी आणि विश्वस्त यांच्यातील विनम्रता या तीर्थक्षेत्राला साजेशी अशी आहे. एकमेकांचा आदर करणे, सुसंवाद ठेवणे हा भाग सर्वच देवस्थानांनी शिकण्यासारखा आहे. एक छोटे देवस्थान असूनही माणगाव येथील श्री दत्त मंदिर न्यास संस्थेचा कारभार या दृष्टीने निश्चितच आदर्शवत् आहे. राज्यातील अन्य देवस्थानांनी याचा निश्चितच अभ्यास करावा. मंदिरांचे व्यवस्थापन सुधारल्यास मंदिरे खर्‍या अर्थाने भाविकांना उपासनेसाठी साहाय्यक ठरतील.