‘१६.२.२०२४ या दिवशी रथसप्तमी होती. त्या निमित्ताने सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना रथाची पूजा करण्यास सांगितले होते. सप्तर्षींनी ‘षोडश-नित्यदेवी यंत्र’ दिले होते. ते यंत्र पूजा करून प्रथम रथात ठेवायचे होते आणि त्यानंतर रथाची पूजा करायची होती.
वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला होता. तेव्हा सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे लाकडाचा रथ बनवण्यात आला होता आणि त्या रथात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना बसवून त्यांची रथयात्रा काढण्यात आली होती. तेव्हा रथात ज्या आसनावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बसले होते, त्या आसनावर पूजा केलेले ‘षोडश-नित्यदेवी यंत्र’ ठेवण्यास सप्तर्षींनी सांगितले होते. ते ठेवल्यावर रथाची पुष्पे वाहून आणि आरती करून पूजा करण्यास सांगितली होती. अशा प्रकारे त्या दिवशीचा कार्यक्रम होता. तेव्हा वातावरणात, तसेच यंत्र आणि रथ यांच्या स्पंदनांमध्ये कसा पालट झाला ? याचा मी अभ्यास केला. तो येथे दिला आहे.
१. रथ आणि ‘षोडश-नित्यदेवी यंत्र’ ठेवलेल्या स्थानी वातावरणात प्रामुख्याने चांगल्या शक्तीची स्पंदने जाणवणे
पूजा करण्याच्या स्थानी रथ ठेवण्यात आला होता आणि त्याच्या समोर पटलावर ‘षोडश-नित्यदेवी यंत्र’ ठेवण्यात आले होते. आरंभी त्या स्थानी वातावरणात अधिकतर चांगल्या शक्तीची स्पंदने मला जाणवत होती. ही शक्तीची स्पंदने मला माझे डोके आणि चेहरा यांवर दाबस्वरूपात जाणवत होती. शक्तीची स्पंदने ही पंचतत्त्वांपैकी पृथ्वीतत्त्वाची असतात. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांपैकी पृथ्वीतत्त्व हे सर्वांत कनिष्ठ स्तराचे अन् जड असते. जडत्वामुळे दाब जाणवतो. त्यामुळे मला तशी अनुभूती आली.
२. ‘षोडश-नित्यदेवी यंत्रा’ची पूजा केल्याने त्याच्या स्पंदनांमध्ये झालेले पालट
पूजेच्या आरंभी सप्तर्षींनी दिलेल्या यंत्रामध्ये शक्ती आणि चैतन्य यांची स्पंदने अधिक प्रमाणात जाणवली. पूजेनंतर यंत्रामधील कनिष्ठ स्वरूपाची शक्तीची (पृथ्वीतत्त्वाची) स्पंदने अल्प होऊन वरिष्ठ स्तराच्या आनंदाच्या (वायुतत्त्वाच्या) स्पंदनांत वाढ झाली. पूजेमुळे यंत्रातील देवीतत्त्व कार्यरत झाले. त्यामुळे असे झाले. तसेच पूजेपूर्वी यंत्र अकार्यरत होते. पूजेनंतर ते कार्यरत झाल्यामुळे त्याच्यातील शांतीची स्पंदने अल्प झाली.
३. पूजेच्या वेळी रथाच्या स्पंदनांमध्ये झालेले पालट
३ अ. आरंभीची रथाची स्पंदने : मे २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रथामध्ये बसले होते; पण आता ९ मासांनंतरही (महिन्यांनंतरही) तो भव्य-दिव्य जाणवत होता. तो आकाराने मोठा जाणवत होता. तसेच ‘रथाची केवळ रेखाकृती आहे’, असे जाणवत होते. याचाच अर्थ त्याच्यामध्ये निर्गुण तत्त्व जाणवत होते. मला जाणवलेल्या रथाच्या स्पंदनांमध्येही शांतीची स्पंदने सर्वाधिक होती.
३ आ. रथामध्ये यंत्र स्थापन केल्यावर रथाची स्पंदने : यंत्र रथामध्ये स्थापन करण्यापूर्वी रथामध्ये निर्गुण स्पंदने आणि पोकळी जाणवत होती; पण यंत्र रथात स्थापित केल्यावर रथाची स्पंदने लगेच पालटली आणि ती सगुण जाणवू लागली. रथाला जागृती आल्यासारखे झाले आणि त्याच्याकडून प्रकाश प्रक्षेपित होऊ लागला. मला रथामधील चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने वाढल्याचे जाणवले. तसेच शांतीची स्पंदने अल्प झाल्याचे जाणवले.
३ इ. यंत्र ठेवलेल्या रथाची पूजा केल्यावर रथाची स्पंदने : रथामध्ये यंत्र स्थापन केल्यानंतर रथाची पुष्पार्चना करून पूजा आणि आरती करण्यात आली. ती केल्यावर रथातून आनंदाची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होऊ लागली, हे बाजूच्या सारणीतून लक्षात येते. आरती करून आपण आपला कृतज्ञता आणि शरणागत भाव व्यक्त करत असतो. त्यामुळे ती देवता प्रसन्न होते आणि तिच्यातून आनंदाची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होऊ लागतात. तसेच येथेही रथाच्या संदर्भात लक्षात आले. यातून आरतीचे महत्त्व लक्षात येते.
वरील अभ्यासातून असे लक्षात येते की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मागील वर्षी रथोत्सव झालेल्या या रथाला या वर्षी सप्तर्षींनी रथसप्तमीच्या निमित्ताने त्याच्यामध्ये यंत्र ठेवायला सांगून आणि त्याची पूजा करवून घेऊन कार्यरत केले. जसे सूर्य भ्रमण करून प्रतिदिन आपल्याला ऊर्जा देतो, तसेच ‘आता हा रथ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सूक्ष्मातून कार्यरत झाला आहे’, असे वाटले. त्याच्यामध्ये स्थापन झालेल्या देवीतत्त्वाच्या यंत्रातून जगभरच्या साधकांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सातत्याने ऊर्जा मिळत राहील.
सप्तर्षी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने हे घडले. यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.२.२०२४)
|