१. संगणक प्रणालीतील लिखाण ‘युनिकोड’मध्ये घेण्याची आवश्यकता
‘अक्षरांचा ‘युनिकोड फॉरमॅट’ हा जगात सर्वत्र वापरला जातो. त्यामुळे भ्रमणभाष, ‘टॅबलेट’, घड्याळापासून ते संगणकापर्यंत सर्व ‘ॲप्लिकेशन्स ‘युनिकोड’ला ‘सपोर्ट’ (साहाय्य) करतात. लिखाणाचा ‘फॉरमॅट’ सर्वत्र एकसारखा असल्यास लिखाणाचे रूपांतर (‘डेटा कन्व्हर्जन’) करणे सोपे होते. सर्व जालस्थाने (‘वेबसाइट्स’) आणि ‘डाटाबेस’ हे सर्व ‘युनिकोड’ला चांगला ‘सपोर्ट’ (साहाय्य) करतात. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये माहिती साठवणे सोपे होते. ‘युनिकोड’ हा ‘फॉरमॅट’ पुढील अनेक वर्षे असणार आहे.
२. सात्त्विक ‘फॉन्ट’ न मिळाल्याने तो सिद्ध करण्याचा निर्णय घेणे
२१.७.२०२० या दिवशी आम्ही काही ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांतील लिखाण ‘युनिकोड’मध्ये घेण्याचे ठरवले. त्याच्या छपाईसाठी योग्य असा ‘युनिकोड फॉन्ट’ आम्हाला हवा होता; पण छपाईसाठी मराठी भाषेच्या दृष्टीने योग्य आणि सात्त्विक असा ‘फॉन्ट’ आम्हाला उपलब्ध होऊ शकला नाही. इतर कंपन्यांकडून ‘युनिकोड फॉन्ट’ करून घ्यायचा झाला, तर त्याची किंमत पुष्कळ होती. त्याच समवेत त्यांनी ‘फॉन्ट’ करून दिल्यावर त्यात सात्त्विकतेच्या दृष्टीने काही सुधारणा असतील, तर त्याप्रमाणे प्रत्येक वेळी पालट करायला आम्हाला वेगळा खर्च करावा लागणार होता. यावर उपाययोजना म्हणून आम्ही स्वतः ‘फॉन्ट’ सिद्ध करण्याचा निर्णय घेतला.
३. ‘युनिकोड फॉन्ट करणे’, हे मोेठे आव्हान असूनही देवाच्या कृपेने चांगला ‘फॉन्ट’ मिळणे
‘युनिकोड फॉन्ट करणे’, हे आमच्यापुढे मोेठे आव्हान होते. त्यामुळे आमची ‘अधिक चांगला फॉन्ट शोधणे’, ही प्रक्रिया चालू झाली. देवाच्या कृपेने दोन दिवसांत एक चांगला ‘फॉन्ट’ मिळाला. आम्ही ‘फॉन्ट’ सिद्ध करण्याची प्रक्रिया चालू केली. आम्ही ‘फॉन्ट’ सिद्ध केला; परंतु तो‘ॲडोब’च्या ‘ॲप्लिकेशन्स’मध्ये योग्यरित्या चालत नव्हता. यामुळे आम्ही ‘ॲडोब’च्या ‘ॲप्लिकेशन्स’ची काय अडचण आहे ?’, हा अभ्यास करणे चालू केले.
४. ‘फॉन्ट’ सेवेत अडचणी येत असल्याने मन अस्वस्थ होणे
मी केलेल्या अभ्यासाच्या अनुषंगाने ‘फॉन्ट’मध्ये आणखी सुधारणा केली. तेव्हा लक्षात आले की, ‘हा इतर सर्व ठिकाणी चालत आहे; परंतु ‘ॲडोब इन डिझाईन’मध्ये चालणे बंद झाला आहे.’ तेव्हा माझे मन फार अस्वस्थ झाले आणि माझी ‘अडचण लवकर सुटावी’, अशी अपेक्षा प्रचंड वाढली. त्यामुळे माझे सेवेत लक्ष लागत नव्हते.
५. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘फॉन्ट’ सेवेतील अडचणींवर उपाय सांगणे
त्यानंतर मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना माझ्या मनाची स्थिती आणि मला सेवेत येणार्या अडचणी सांगितल्या. त्यानुसार त्यांनी मला माझी सेवा चालू असतांना एक जप करायला सांगितला. त्यांनी एका ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकाला एक जप दोन घंटे करायला सांगितला आणि त्याला ‘फॉन्ट’ सेवेतील अडचणी सुटण्यासाठी प्रार्थना करायला सांगितली.
६. अडचणी सोडवतांना ‘आपल्या हातात काही नाही’, याची जाणीव होऊन देवाने मनात विचार देणे अन् संगणक पाहिल्यानंतर ‘फॉन्ट’ व्यवस्थित दिसणे
नामजप करण्यासाठी एका साधकाला सांगून आम्हीही देवाला पूर्ण शरण गेलो. आम्हाला ‘आपल्या हातात काही नाही’, याची जाणीव झाली होती. मी प्रार्थना करत असतांना देवाने माझ्या मनात विचार दिला की, ‘तू एवढी काळजी का करत आहेस ? तुझा ‘फॉन्ट’ सिद्ध झाला आहे.’ हा विचार मनात आल्यावर मी तात्काळ संगणकामध्ये पाहिले, तर माझ्या लक्षात आले की, ‘आधी ‘इन डिझाईन’मध्ये हा ‘फॉन्ट’ व्यवस्थित दिसत होता. नंतर इतर ‘ॲप्लिकेशन्स’मध्येही तो व्यवस्थित दिसू लागला होता.’ आम्ही आमचा ‘फॉन्ट’च्या संदर्भातील निर्णय पालटणार, इतक्यातच आम्हाला देवाने दिलेली ही मोठी अनुभूती होती. देवाच्या कृपेने सेवेतील सर्व अडथळे दूर होऊन आम्हाला ‘फॉन्ट’ व्यवस्थित दिसू लागला.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना केल्यावर अडचण सुटली असल्याचे लक्षात येणे
२३.७.२०२१ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. आम्ही या दिवशी ‘युनिकोड फॉन्ट’ प्रकाशित करण्याचे ठरवले होते. त्याच्या दोन दिवस आधी ‘फॉन्ट’ अंतिम करतांना ‘फॉन्ट’मध्ये एक मोठी अडचण निर्माण झाली. त्यात अक्षरांना दिलेले अनुस्वार आणि रफार हे त्या अक्षरापूर्वीच येत होते. त्यामुळे माझा ताण पुन्हा वाढला. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना केली की, ‘उद्या गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त तुम्हाला ही सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्यायची असेल, तर होईल. सर्व तुमची इच्छा ! आम्ही तर आता प्रयत्न करून थकलो आहोत.’ मी त्यांना शरण जाऊन केवळ ५ मिनिटे ‘फॉन्ट’ आणि संगणक यांकडे पहात होतो. तेवढ्यात अकस्मात् माझ्या मनात ‘एका पाठोपाठ दिलेले दोन निर्देश (Commands) एकाच वेळी कार्यरत होत असतील’, असा विचार आला. त्यानंतर मी त्या निर्देशांचा क्रम पालटला, तर लगेचच अडचण सुटली आणि ठरवल्याप्रमाणे आम्ही गुरुपौर्णिमेला ‘फॉन्ट’ प्रकाशित करू शकलो. या सेवेतून मला ‘युनिकोड फॉन्ट’ सिद्ध करण्याची पद्धत शिकायला मिळाली.
जेव्हा आपण कर्तेपणा घेऊन सेवा करत असतो, तेव्हा त्यात आपला बराच वेळ व्यर्थ जातो आणि आपली साधनाही होत नाही. आपण कर्तेपणाचा त्याग करून शरणागतभावाने सेवा केली, तर ती सेवा लगेच पूर्ण होते आणि आपल्याला सेवेतून आनंदही अनुभवता येतो’, असे मला यातून शिकायला मिळाले. गुरुदेवांनी या सेवेतून मला भरपूर शिकवले आणि त्यांनीच ही सेवा माझ्याकडून करवून घेतली. सेवा करतांना त्यांनीच माझ्या मनावर शरणागतीचे महत्त्वसुद्धा बिंबवले.
परम दयाळू आणि परम कृपाळू सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. सुमित भागवत सरोदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |