पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’तून प्रकल्प उभारण्याचे नियोजन !

सिटी सेंटर, मोशीमध्ये नवीन स्टेडियम, अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचे नूतनीकरण प्रकल्प !

पिंपरी (पुणे) – महापालिकेचा वर्ष २०२४-२५ चा ८ सहस्र ६७६ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला आहे. यामध्ये ‘सिटी सेंटर’, मोशीमध्ये ‘नवीन स्टेडियम’ (क्रीडांगण) आणि नेहरूनगर येथील ‘जुन्या अण्णासाहेब मगर स्टेडियमचा विकास’ आदी प्रकल्प ‘पीपीपी’ म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्याचे नियोजन केले आहे.

महापालिकेने विविध प्रकल्प उभारून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचा संकल्प केला आहे. काही प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर, काही प्रकल्प कर्जरोखे उभारून, तर काही प्रकल्प स्वत:सह केंद्र अाणि राज्य सरकारच्या अनुदानातून उभारले जात आहेत. त्यामुळे शहराला एक वेगळी ओळख प्राप्त होत असून त्याचे सूतोवाच महापालिका वित्त आणि लेखा विभागाने आयुक्त यांच्याकडे सादर केलेल्या वर्ष २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून दिसत आहे.

१. सिटी सेंटर – हे चिंचवड आरक्षण क्रमांक १८१ ड ‘बिझनेस सेंटर’साठी ‘संकल्पना करा, बांधा, अर्थपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतरित करा’ (डी.बी.एफ्.ओ.टी.) तत्त्वावर विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये व्यावसायिक गाळे, हॉटेल्स, सेवा दुकाने (सर्व्हिसिंग सेंटर) असतील.

२. मोशी स्टेडियम – सर्व्हे क्रमांक ४३५ येथे २५ सहस्र आसन क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्याचे नियोजन आहे.

३. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल – शहरांमध्ये चांगल्या प्रकारचा क्लब निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘बीओटी’ तत्त्वांवर हे क्रीडा संकुल विकसित करण्याचे नियोजित आहे.