पाकिस्तानचे हवाईदलप्रमुख झहीर बाबर सिद्धू यांचा भ्रष्टाचार उघड केल्याची ‘शिक्षा’ !
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या हवाईदलाने १३ वरिष्ठ अधिकार्यांना अटक केली आहे. पाकिस्तानचे हवाईदलप्रमुख झहीर बाबर सिद्धू यांचा भ्रष्टाचार उघड केल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे बोलले जात आहे. अटक करण्यात आलेले काही अधिकारी आता निवृत्त झाले आहेत. या अधिकार्यांमध्ये एअर मार्शल अहसान रफिक, एअर मार्शल तारिक झिया आणि एअर मार्शल (निवृत्त) जावेद सईद यांचा समावेश आहे. हा तोच जावेद सईद आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या बालाकोट आक्रमणानंतर पाकिस्तानी हवाई दलाने ‘ऑपरेशन स्विफ्ट रिटॉर्ट’ चालू केले होते. २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी भारताने पाकमधील बालाकोटवर हवाई आक्रमण केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानची लढाऊ विमाने २७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी भारताच्या सीमेत घुसली होती. त्याला ‘ऑपरेशन स्विफ्ट रिटॉर्ट’ म्हटले जाते.
विरोधकांना संपवण्यासाठी अधिकार्यांना अटक
पाकिस्तानी हवाईदल प्रमुखांचा भ्रष्टाचार याआधीही झाकण्याचा प्रयत्न केला होता; पण तो प्रसारमाध्यमांनी उघड केला. यानंतर पाकिस्तानी हवाईदलाने अन्वेषण चालू केले आणि आता सुमारे १३ अधिकार्यांना अटक करण्यात आली. तज्ञांच्या मते हे सर्व प्रामाणिक अधिकारी आहेत. पाकिस्तानी हवाईदल प्रमुखांना त्यांचा कार्यकाळ वाढवायचा आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या विरोधकांची संपवू पहात असल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानी सैन्यप्रमुखही भ्रष्ट
यापूर्वी पाकिस्तानी सैन्यप्रमुखांनी शस्त्रास्त्रांच्या खरेदी व्यवहारात फेरफार करून पैसे कमावल्याचे उघड झाले होते. भ्रष्टाचाराच्या पैशांतून त्यांनी महागड्या गाड्या आणि घरे खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानी हवाईदल प्रमुख झहीर बाबर सिद्धू यांचे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी संबंध असल्याचा आरोप होत आहे.