Pakistan Elections : शाहबाज शरीफ पंतप्रधान, तर असिफ अली झरदारी राष्ट्रपती होणार !

पाकिस्तानमध्ये पी.एम्.एल्.-एन् आणि पीपीपी या पक्षांत युती

पी.एम्.एल्.-एन्.चे शाहबाज शरीफ व पीपीपीचे असिफ अली झरदारी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे गेले १२ दिवस अस्थिरता होती. अंततः सत्तास्थापनेसाठी ‘पाकिस्तान मुस्लिम लिग-नवाझ (पीएम्एल्-एन्)’ आणि ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी)’ यांच्यात चर्चा युती करण्यावर एकमत झाले आहे. यात पी.एम्.एल्.-एन्.चे शाहबाज शरीफ हे पंतप्रधान होणार असून पीपीपीचे असिफ अली झरदारी राष्ट्रपती होणार आहेत.

पाकमध्ये ८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय निवडणूक झाली होती. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गडबड करण्यात आली, असा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे निवडणूक लढवण्यावर बंदी असलेल्या पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांचा गट या निवडणुकीत सर्वांत मोठा गट म्हणून समोर आला होता. एकूण ९३ जागांवर अपक्ष उमेदवारांचा, तर पी.एम्.एल्.-एन् पक्षाचा ७५ आणि पीपीपीचा ५४ जागांवर विजय झाला.