पंढरपूर – अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून पंढरपूर येथे ‘६५ एकर’मध्ये भजन आंदोलन करण्यात येणार होते; मात्र प्रशासनाने १९ फेब्रुवारीला नायब तहसीलदार सुधाकर दाईंगे यांनी वारकरी मंडळास चर्चेसाठी बोलावले. चर्चेमध्ये दिंड्यांना जागा वाटपाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. माघवारी २०२३ मध्ये जे वाटप करण्यात आले, त्याप्रमाणे वर्ष २०२४ मध्येही करण्यात आले. त्यामुळे यापुढील काळातही तसेच जागा वाटप करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’ने ठिय्या आंदोलन आणि भजन आंदोलन स्थगित केले आहे, अशी माहिती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली.
ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे पुढे म्हणाले की, दिंड्या ज्या जागेचा वापर करतात, त्यासाठीच्या जागेची सूची ही ‘ऑनलाईन’ पद्धतीने सिद्ध केली होती. त्यामुळे यापुढील काळातही प्रत्येक दिंडीस तीच जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. भागवत चवरे महाराज, ह.भ.प. जोतीराम महाराज चांगभले, ह.भ.प. किसन कापसे महाराज, ह.भ.प. संजय पवार महाराज, ह.भ.प. सचिन गायकवाड महाराज उपस्थित होते.