पाकिस्तानी कलाकार हवेत कशाला ?

पाकिस्तानी कलाकार

साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी समस्त वाहिन्यांवर ‘रिॲलिटी शो’चे पेव फुटले होते. यांमध्ये गाणे आणि नृत्य यांचे कार्यक्रम अधिक प्रमाणात असत. या प्रत्येक कार्यक्रमात किमान एकतरी स्पर्धक पाकिस्तानी असे. अंतिम फेरीपर्यंत या स्पर्धकाला स्पर्धेमध्ये ठेवले जात असे. या पाकिस्तानी गायकांना लघुसंदेशाद्वारे मतदान करण्यामध्ये भारतीय तरुण-तरुणी आघाडीवर असत. पाकिस्तान एकीकडे भारताच्या सीमेवर कुरापत्या काढत भारतविरोधी आतंकवादी कारवाया करण्याचे नियोजन करत होता, तर दुसरीकडे भारतीय रसिक मंडळी ‘कलेला सीमा आणि धर्म यांचे बंधन नसते. कला दोन देशांना जोडणारा दुवा आहे’, असे सांगत पाकिस्तानी कलाकारांसाठी पायघड्या अंथरत होती. केवळ ‘रिॲलिटी शो’ नव्हे, तर हिंदी चित्रपटांत गायक आणि अभिनेते म्हणून पाकिस्तानी कलाकारांना निमंत्रित करण्यात येऊ लागले.

माहिरा खान, फवाद खान, आतिफ असलम, अली जफर, जावेद शेख, राहत फतेह अली खान यांसारखी कलाकार मंडळी भारतात येऊन लाखो रुपये कमावू लागली. भारतात यांचे लाखोंनी ‘फॅन फॉलोअर्स’ (चाहते अनुयायी) निर्माण होऊ लागले. येथील काही राष्ट्रप्रेमी संघटना, राजकीय मंडळी पाक कलाकारांच्या भारतातील वाढत्या प्रभावाच्या विरोधात उभी ठाकली होती; मात्र भारतियांचे देशप्रेम या कलाकारांप्रतीच्या प्रेमापुढे फिके पडत होते. वर्ष २०१६ मध्ये उरी येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर मात्र पाकिस्तानविरोधात समस्त देशवासियांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आणि पाकिस्तानी कलाकारांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची मागणी जोर धरू लागली. शेवटी त्याच वर्षी पाक कलाकारांवर बंदी घालण्यात आली. भारतात आलेल्या पाकिस्तानी कलाकारांना गाशा गुंडाळून मायदेशी परतावे लागले. भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित संस्थांसह निर्माता संघटना यांना पाकिस्तानी कलाकार, गायक, संगीतकार, गीतकार आणि तंत्रज्ञ यांसमवेत काम करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्याच्या मागणीसाठी चित्रपटसृष्टीतील फैझ अन्वर कुरेशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली; मात्र ‘देशभक्ती सिद्ध करण्यासाठी शेजारील देशाच्या कलाकारांशी शत्रुत्व बाळगण्याची आवश्यकता नाही. पाक कलाकारांना विरोध ही देशभक्ती नव्हे’, अशी टीपणी करत न्यायालयाने १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ही याचिका फेटाळली. नंतर सर्वोच्च न्यायालयानेही यावर री ओढली. त्यामुळे पाक कलाकारांना पुन्हा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कलेची भूमी असलेल्या भारतातील बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी पाक कलाकारांनी  येण्याची प्रथा बंद होण्यासाठी आता भारतीय जनतेनेच आता पुढाकार घ्यायला हवा !

– श्री. जगन घाणेकर, मुंबई