‘१७.२.२०२३ या दिवशी मला होणार्या त्रासाच्या संदर्भातील लिखाण करत होते. त्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील छायाचित्राकडे पाहून मी माझ्या मनातील सर्वकाही त्यांना सांगत होते. त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलत असतांना मला रडायला येणार होते. तेवढ्यात माझ्या मनात विचार आला, ‘आपण श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पत्र लिहूया’; म्हणून मी त्यांना पत्र लिहायला घेतले. पत्र अर्धे लिहून झाले, तेवढ्यात एक साधिका माझ्या खोलीत आली. ती मला म्हणाली, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुला गजरा दिला आहे.’’ त्याच क्षणी ‘देवाचे माझ्याकडे किती लक्ष आहे ! ‘मी खोलीत त्यांच्या छायाचित्रासमोर बसून त्यांच्याशी बोलत आहे’, हे त्यांच्यापर्यंत पोचले (असे प्रसंग यापूर्वी २ – ३ वेळा झाले आहेत.)’, असे विचार मनात येऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. स्थुलातून त्यांनी मला आध्यात्मिक लाभासाठी गजरा पाठवला होता. ‘देवा, ‘मी तुला अपेक्षित असे काहीच करत नाही, तरी तुझे माझ्याकडे किती लक्ष आहे !’, हे मी शब्दात मांडू शकत नाही. भगवंता, तू माझ्यावर किती प्रेम करताेस रे ! त्या वेळी मला पुढील भक्तीगीताची आठवण झाली.
मागे उभा मंगेश ।
पुढे उभा मंगेश ।
माझ्याकडे देव माझा पहातो आहे ।।
मी हे माझे लिखाण श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करते.’
– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०२३)
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |