दि‍वसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गोवंडीतील आगीत १२ ते १५ झोपड्या जळून खाक !;  नागरिकांच्या सहकार्याने नक्षलवाद संपवू ! – रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक……

गोवंडीतील आगीत १२ ते १५ झोपड्या जळून खाक !

मुंबई – गोवंडीमधील बैंगनवाडी परिसरातील झोपडपट्टीत १७ फेब्रुवारीला पहाटे भीषण आग लागली. त्यात १२ ते १५ झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही घायाळ झाले नाही. या आगीत गॅस सिलेंडरचे स्फोटही झाले. अग्नीशमनदलाने दीड घंट्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. गोदामांमधील साहित्य आणि घरांतील सामानाची यात पुष्कळ हानी झाली.


नागरिकांच्या सहकार्याने नक्षलवाद संपवू ! – रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक

गडचिरोली – गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी येत्या काळात नागरिकांच्या सहकार्यानेच आम्ही नक्षलवाद संपवू, अशी चेतावणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी येथील पोलीस जनजागरण मेळाव्यात बोलतांना दिली.


बसच्या धडकेत ६३ वर्षीय महिला ठार !

पनवेल – शहरातील राज्य परिवहन मंडळाच्या बस डेपोत भरधाव जाणार्‍या बसच्या धडकेत ६३ वर्षीय महिला ठार झाली आहे. कल्पनाचंद ठाकूर असे तिचे नाव आहे. बसचालक मन्सूर शेख याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.


पनवेल येथे पायी जाणार्‍या चौघांना लुटले !

पनवेल – खांदेश्वर आणि नवीन पनवेल वसाहतीमध्ये पायी जाणार्‍यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. गेल्या ९ दिवसांत सोनसाखळी चोरीच्या ४ घटना घडल्या. अद्याप चोरांचा शोध लागलेला नाही. यामुळे पायी जाणारे रहिवासी भयभीत आहेत.


ठाणे येथे अमली पदार्थ तस्करी करणारे अटकेत !

ठाणे – अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केले असून त्यात ८ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५५ लाख ७३ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ आणि रसायने जप्त केली आहेत.


राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड !

मुंबई – राज्यसभा निवडणुकीत भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती; मात्र भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुजरातचे केतनभाई पटेल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मागील ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच साखर संघावर भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे.


पुणे येथील ‘ससून’मधून पसार झालेला मार्शल लीलाकर याला अटक !

स्वाती मोहोळ धमकी प्रकरण !

पुणे – ‘ससून रुग्णालया’तून ११ फेब्रुवारी या दिवशी पसार झालेला आरोपी मार्शल लीलाकर याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती यांना ‘सामाजिक माध्यमा’तून धमकी दिल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तो रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ‘सायबर पोलीस’ आणि ‘गुन्हे शाखे’चे पोलीस पथक त्याचा शोध घेत होते. तो येरवडा येथील त्याच्या मावशीच्या घरी येणार, अशी माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून त्याला अटक करण्यात आली आहे.