पुणे येथील ‘गायीच्या शेणापासून रंगनिर्मिती’ या विषयावरील तांत्रिक चर्चासत्राचे उद्घाटन !
पुणे – देशी गोवंशियांच्या संवर्धनासाठी राज्यातील ४० गोशाळा ‘स्मार्ट गोशाळा’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या साहाय्यातून हा ‘स्मार्ट गोशाळा’ प्रकल्प साकारणार आहेत, अशी माहिती ‘गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ते ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे ‘टेक्निकल इन्स्टिट्यूट’ आणि ‘मोरोपंत पिंगळे गोधन फाऊंडेशन’ यांच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘गायीच्या शेणापासून रंगनिर्मिती’ या विषयावरील तांत्रिक चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
मुंदडा यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील गोवंशियांची संख्या १ कोटी ३९ लाख एवढी असून त्यामधील देशी गोवंशियांची संख्या केवळ १३ लाख आहे. या देशी गोवंशियांचा सांभाळ करतांनाच एकही गाय पशूवधगृहामध्ये जाणार नाही, हे ध्येय ठेवून गोसेवा आयोगाचे कार्य चालू आहे. राज्यात १ सहस्र ६८ गोशाळा असून त्यातील ४० गोशाळांमध्ये १ सहस्रांहून अधिक गोवंशियांचा सांभाळ केला जातो. या गोशाळा ‘स्मार्ट गोशाळा’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. येथील गायींच्या शेणापासून ‘सी.एन्.जी. गॅस’ची निर्मिती करण्याची योजना हाती घेतली जाणार आहे. त्या संदर्भातील करार केंद्र सरकारशी लवकरच करण्यात येईल.
गायीचे शेण आणि गोमूत्र यांचा उपयोग, त्यापासून उत्पादने सिद्ध करणे या क्षेत्रांमध्ये क्रांती होणे आवश्यक असून तसे झाले, तर देशी गायी वाचवण्यात यश येईल, अशी आशाही मुंदडा यांनी व्यक्त केली.