‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प्रतिदिन आरतीला उपस्थित रहाणे,  सेवा करणे आणि महाप्रसाद ग्रहण करणे’, यांमुळे साधकामध्ये झालेला पालट !

देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम

१. आरतीतील चैतन्यामुळे ‘सिगरेट ओढणे आणि तंबाखू अन् मावा खाणे’ ही व्यसने सुटणे

‘श्री गुरूंच्या कृपेने मी मागील काही वर्षे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प्रतिदिन आरतीसाठी येतो. आरतीतील चैतन्यामुळे मागील ५ – ६ वर्षांपासून माझे ‘सिगरेट ओढणे आणि तंबाखू अन् मावा खाणे’, ही व्यसने सुटली.

२. आश्रमात प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करू लागल्यापासून मांसाहार करण्याची इच्छा उणावणे

आता मी सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ‘मी दोन्ही वेळा आश्रमात आरतीसाठी येतो आणि आश्रमात सेवा करतो. श्री गुरूंच्या कृपेमुळे मला आश्रमात प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करायला मिळत आहे. त्यामुळे माझी मांसाहार करण्याची इच्छाही उणावत चालली आहे. ‘ही पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत) यांची माझ्यावरील कृपा आहे’, असे मला वाटते.

३. निवृत्तीवेतन मिळत नसूनही कुठलीही अडचण न येणे

महानगरपालिकेतील कामातून सेवानिवृत्ती घेऊन मला दीड वर्ष झाले; पण अजूनही मला निवृत्तीवेतन मिळत नाही. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे आमचा संसार व्यवस्थितपणे चालू आहे. तसेच मला मधुमेह आहे, तरी मी स्थिर असतो.

माझ्या जीवनातील या पालटांसाठी मी गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. ‘अशीच कृपा आम्हा सर्व साधकांवर सदैव राहू दे’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो.’

– श्री. संदीप घोलप, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.१.२०२४)

सौ. वीणा म्हात्रे यांना श्री. संदीप घोलप यांच्याविषयी जाणवलेले सूत्र !

‘श्री. घोलपकाका नियमितपणे मासाच्या आरंभी न मागता अर्पण देतात. त्यात कधीही खंड पडला नाही. त्यांचा ‘कृतीत सातत्य असणे’, हा गुण मला शिकता आला. त्यांचे सर्व कुटुंबीय (वडील, पत्नी आणि ३ मुली) आनंदाने एकत्र रहातात. ‘काकांचे हे गुण माझ्यातही यावेत’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. वीणा हेमंत म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६७ वर्षे), देवद, पनवेल. (४.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक