वैद्यकीय अभ्यासक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू !

पुणे – राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण घेत असलेली वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा ५ मे दिवशी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया चालू झाली असून ९ मार्चपर्यंत त्यासाठी मुदत दिली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या शहरांमध्येही यावर्षी वाढ केली आहे. गेल्यावर्षी असलेल्या ४९९ शहरांऐवजी आता ५५४ शहरांमध्ये या परीक्षेची परीक्षा केंद्रे असतील. उमेदवारांना त्यांच्या पसंतीची ४ शहरे निवडता येणार आहेत, अशी माहिती एन्.टी.ए.ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. एम्.बी.बी.एस्., बी.ए.एम्एस्. अशा विविध प्रकारच्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. तसेच ४ वर्षांच्या बी.एस्.सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा द्यावी लागणार आहे. या प्रवेश परीक्षेचा निकाल १४ जून या दिवशी घोषित होणार आहे. मराठीसह एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा देता येते.