महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या सभा होऊ देणार नाही ! – जरांगे यांची शासनाच्या शिष्टमंडळाला चेतावणी

जालना येथे शासनाचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीस !

जालना – महाराष्ट्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, अशी चेतावणी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जरांगे पाटील यांना शासनाचे शिष्टमंडळ भेटायला गेले होते, त्या वेळी त्यांनी ही चेतावणी दिली. जरांगे यांचा आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांचे चौथ्या दिवशीही उपोषण चालू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी १४ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले होते. त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याचे आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली; मात्र ते उपोषण मागे घेण्यास सिद्ध नाहीत.

गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया कधी होणार ?

या वेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांचे घोटाळे मागे घेतले. ४ मास झाले प्रक्रिया चालू आहे. तुम्हाला राज्य शांत बघायचे नाही. ५ मासांपासून केवळ प्रक्रिया चालू आहे. आम्हालापण पोलिसांविरुद्ध बीड आणि राज्यभर खटले प्रविष्ट करायचे आहेत.

जरांगेंसाठी ३ पेक्षा अधिक दिवसांचे उपोषण जीवघेणे ! – आधुनिक वैद्यांची चेतावणी

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचा विचार करता सलग ३ दिवस अन्नपाणी न घेणे त्यांच्या जिवावर बेतू शकते. यातून त्यांना मेंदूचा पक्षाघात, किडनी, यकृतावर सूज येणे, असे प्रकार घडू शकतात, अशी भीती छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. विनोद चावरे यांनी व्यक्त केली.