१. काही कारणाने ‘वैभवलक्ष्मी’चे व्रत पूर्ण होऊ न शकणे
‘वर्ष १९९९ च्या शेवटी मी ११ शुक्रवार ‘वैभवलक्ष्मी’चे व्रत करायचे ठरवले होते; पण त्याच सुमारास मला सनातन संस्थेने सांगितलेली साधना कळली. त्यानंतर काही कारणाने माझ्याकडून ते व्रत पूर्ण होऊ शकले नाही.
२. मुलाला सतत शारीरिक त्रास होणे आणि तेव्हा एका साधकाने ‘नवस इत्यादी पूर्ण करायचे राहिले असल्यास ते पूर्ण करा’, असे सांगणे
त्यानंतर माझा विवाह झाला. माझ्या मुलाला (कु. मुकुल प्रभु (वय ११ वर्षे) याला) सतत शारीरिक त्रास होत होते. जुलै २०२२ च्या दुसर्या आठवड्यात निसर्गाेपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी आमच्या घरी आले होते. ते म्हणाले, ‘‘तुमचे नवस इत्यादी अर्धवट राहिले आहेत का ?’, ते पहा आणि राहिले असतील, तर ते पूर्ण करून घ्या.’’ तेव्हा मला माझे ‘वैभवलक्ष्मी’चे व्रत अपूर्ण राहिल्याची आठवण आली.
३. सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी ‘व्रत अपुरे राहिल्याची रुखरुख राहू नये’, यासाठी एका सवाष्णीला घरी जेवायला घालून तिची ओटी भर’, असे सांगणे
सनातनची सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ती साधिका सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) माझी आध्यात्मिक मैत्रीण आहे. मी तिला हा विषय सांगितला. मधुराताई मला म्हणाली, ‘‘एखाद्या सवाष्णीला घरी बोलावून तिला जेवू घाल आणि तिची ओटी भर, म्हणजे तुझ्या मनातले निघून जाईल.’’ तिच्या या बोलण्याने माझे मन शांत झाले.
४. मधुराताईंनी संत साक्षात् महालक्ष्मीस्वरूपच असल्याचे सांगून एका स्त्री संतांना जेवायला बोलवून त्यांची ओटी भरण्यास सुचवणे
त्यानंतर काही वेळाने मधुराताईचाच मला भ्रमणभाष आला. ती म्हणाली, ‘‘तू एका स्त्री संतांना घरी जेवायला बोलव. संत साक्षात् महालक्ष्मीस्वरूपच असतात.’’ मी संतांना मनोमन प्रार्थना केली, ‘हे अंबाबाई, हे वैभवलक्ष्मी माते, तूच मधुराताईच्या माध्यमातून मला हा मार्ग सुचवला आहेस. तूच तो पूर्णत्वाला ने.’
५. स्त्री संतांना जेवणाचे निमंत्रण दिल्यावर त्यांनी ‘मी श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी येईन, माझ्यासाठी नेहमीचाच स्वयंपाक कर’, असे सांगणे
त्यानंतर मी त्या स्त्री संतांना विचारले, ‘‘तुम्ही माझ्या घरी (माहेरी) जेवायला येऊ शकता का ?’’ त्यांनी ‘श्रावण मासातील शेवटच्या शुक्रवारी येते’, असे सांगून माझे निमंत्रण स्वीकारले. त्यांनी मला निरोप पाठवला, ‘मी तुमच्या घरी येणार आहे. साधाच स्वयंपाक कर. तू जे करशील, ते मी खाईन.’
६. स्त्री संतांच्या वरील निरोपामुळे मन कृतज्ञतेने भरून येणे
स्त्री संतांच्या या निरोपाने माझे मन कृतज्ञतेने भरून आले आणि आनंदाने नाचू लागले. त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘हे अंबाबाई, तुझी किती कृपा ! साक्षात् अंबाबाई घरी येऊन माझी ओटी स्वीकारणार आणि माझे व्रत पूर्णत्वास नेणार ! स्त्री संतांच्या माध्यमातून साक्षात् ‘श्री वैभवलक्ष्मी माता’ माझी ओटी स्वीकारण्यास, माझे सर्व कष्ट दूर करण्यास आणि माझी साधना करून घेण्यास येत आहे.’ त्यानंतर माझ्याकडून सतत कृतज्ञता व्यक्त होऊ लागली.
७. स्वयंपाक करतांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती !
७ अ. कूकरची शिटी न झाल्याने त्याचे झाकण उघडल्यावर हातावर वाफ येऊन उकळते पाणी अंगावर सांडणे; पण देवीच्या कृपेने मोठी दुखापत न होणे : स्त्री संत ज्या दिवशी जेवायला येणार होत्या, त्या दिवशी अमावास्या होती. मी पहाटे उठून स्वयंपाकाची सिद्धता करत होते. मला स्वतःवर त्रासदायक आवरण जाणवत असल्यामुळे कूकर लावल्यावर मी थोडा वेळ देवासमोर बसले. कूकरच्या शिटीचा आवाज न आल्यामुळे ‘काही अडचण आहे का ?’, हे पहायला मी उठले आणि कूकरचे झाकण उघडले. तेव्हा माझ्या हातावर एकदम वाफ आली आणि अंगावर उकळलेले पाणी सांडले; पण देवीच्या कृपेने केवळ हातावर वाफ आल्याने हाताची जळजळ झाली. बाकी मला काहीच झाले नाही. देवीच्या कृपेने मी मोठ्या संकटातून वाचले.
७ आ. पाय दुखत असूनही देवीने स्वयंपाक करून घेतल्याचे जाणवणे : स्वयंपाक करतांना माझे पाय पुष्कळ दुखत होते, तरीही देवीने माझ्याकडून स्वयंपाक करून घेतला. माझी आई (सौ. माधवी घाटे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६९ वर्षे ) आणि लहान बहीण योगिता घाटे यांनी स्वयंपाक करण्यासाठी मला पुष्कळ साहाय्य केले.
८. स्त्री संतांना आणायला जातांना वाटेत केलेला भावजागृतीचा प्रयोग !
मी आणि माझे बाबा श्री. किशोर घाटे त्या स्त्री संतांना घरी घेऊन येण्यासाठी निघालो. ‘साक्षात् देवी घरी येणार आहे. तिचे भावपूर्ण स्वागत करूया’, या भावाने आम्ही वाटेत भावजागृतीचा प्रयोग केला. तेव्हा आम्ही संतांच्या येण्याच्या वाटेवर सूक्ष्मातून फुलांच्या पायघड्या घातल्या आणि पणत्या अन् तोरणे लावली.
९. स्त्री संत घरी येत असतांना त्यांनी बाबांना सांगितले, ‘‘तुमच्या दोन्ही मुली आता आमच्या झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी करू नका. ’’ ते ऐकून मला अत्यंत कृतज्ञता वाटली.
१०. स्त्री संतांचे घरी आगमन झाल्यावर जाणवलेली सूत्रे
१० अ. स्त्री संतांनी साधिकेने केलेल्या स्वयंपाकाचे कौतुक करणे आणि ‘गुरुकृपेने माझे तुमच्या घरी येणे झाले’, असे सांगणे : ‘घरात नवरात्र असून घरी साक्षात् देवी आली आहे’, असे घरचे वातावरण झाले होते. स्त्री संत आणि घरातील इतर सदस्य जेवायला बसले. ‘देवीलाच नैवेद्य दाखवत आहे’, या आध्यात्मिक भावाने मी स्त्री संतांसमोर नैवेद्याचे ताट ठेवले. त्याही ‘माझ्या मनाचे समाधान होईल’, असे जेवल्या. त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘स्वयंपाक पुष्कळ सात्त्विक झाला आहे. ‘मी नैवेद्यच ग्रहण करत आहे’, असे मला जाणवले.’’ ते ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘हे सर्व देवानेच घडवून आणले असून ही श्री गुरूंचीच कृपा आणि इच्छा आहे. साक्षात् गुरुतत्त्वच तुमच्या घरी आले आहे. माझे अस्तित्वच नाही.’’
१० आ. स्त्री संतांचा घरातील सहज वावर पाहून ‘त्या संतांच्या माध्यमातून गौरीच घरभर फिरत आहे’, असे वाटणे : स्त्री संत जणू आमच्या कुटुंबातीलच असल्याप्रमाणे आमच्याशी सहजतेने वागत-बोलत होत्या. त्या घरात सहजतेने वावरत होत्या, तसेच घरातील प्रत्येक भाग, कपाट, सर्व साहित्य जवळून आणि आपुलकीने पहात होत्या. गौरी-गणपतीच्या वेळी आम्ही गौरीचा कलश घेऊन घरभर कानाकोपर्यात फिरून तिला घर दाखवायचो. स्त्री संतांचा घरातील सहज वावर पाहून ‘त्या संतांच्या माध्यमातून गौरीच घरभर फिरत आहे’, असे मला वाटले.
११. घरातील सर्वांनी अनुभवलेली भावावस्था !
घरात सर्वत्र प्रकाश पसरला असून घर व्यापक आणि मोठे झाले आहे’, असे आम्हाला जाणवत होते. आम्ही सर्व जण भावावस्थेत होतो. सर्वांचे मन देवीच्या चरणी एकाग्र झाले होते.स्त्री संतांची ओटी भरतांना माझ्या मनामध्ये भाव दाटून आला होता. मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. घरात जणू मी आणि देवी (स्त्री संत) दोघीच होतो. त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केल्यावर माझे मन पुष्कळ शांत झाले.
१२. स्त्री संतांनी ‘आता जोमाने साधना करून आध्यात्मिक प्रगती कर’, असे सांगणे आणि तेव्हा ‘देवीच आशीर्वाद देत आहे’, असे जाणवणे
ओटी भरून झाल्यावर स्त्री संत मला म्हणाल्या, ‘‘तुझे पूर्वी जे काही देवाचे करायचे राहिले असेल, ते सर्व यातून पूर्ण झाले. आता चांगली साधना कर. मुलांची काळजी करू नकोस आणि लवकर आध्यात्मिक प्रगती कर.’’ त्यांच्या या मधुर आणि आश्वस्त करणार्या वचनांनी ‘देवीच मला आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले.
१३. कुटुंबियांना आलेल्या अनुभूती
१३ अ. श्री. किशोर घाटे (सौ. नेहा प्रभु यांचे वडील, वय ७२ वर्षे) : स्त्री संत घरी आल्यावर ‘आमची कुलदेवी ‘श्री महालसा नारायणी’ घरी आली’, असे जाणवून माझे मन प्रसन्न झाले.’
१३ आ. कु. मुकुल प्रभु (सौ. नेहा प्रभु यांचा मुलगा, वय ११ वर्षे) : ‘संत घरी असतांना मला पूर्णवेळ सूक्ष्मातून शंखनाद ऐकू आला.’
वरील लेख लिहित असतांना माझी अखंड भावजागृती होत होती. मला हुंदके येऊन रडू येत असल्याने लिहायलाही जमत नव्हते. केवळ श्री गुरूंच्या कृपेने प्रार्थना करून मी हे लिहू शकले. ते सर्व त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.’
– सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.९.२०२२)
|