ससून रुग्णालयात लागलेल्या आगीचा धोका टळला !

अज्ञात व्यक्तीच्या धूम्रपानामुळे आगीची शक्यता

पुणे – ससून रुग्णालयाला आग लागल्याचे समजताच अग्नीशमन मुख्यालय आणि नायडू अग्नीशमन केंद्र येथून प्रत्येकी एक अशी अग्नीशमन वाहने पाठवण्यात आली होती. अग्नीशमनदलाच्या जवानांना रुग्णालयातील नवीन इमारतीत दहाव्या मजल्यावर आग लागल्याचे समजताच त्यांनी तिकडे धाव घेतली. तेथील वॉर्डमधील शौचालयामागे असणार्‍या पाईपमध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी तातडीने अग्नीरोधक उपकरण वापरून आग आटोक्यात आणल्याने मोठा धोका टळला होता. वॉर्डमधील रुग्ण सुखरूप असून रुग्णालयातील आग पूर्णपणे विझली आहे. यामध्ये कुणी घायाळ झाले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही. शौचालयात अज्ञात व्यक्तीने धूम्रपान केल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.