France Ban SmartPhones : फ्रान्समधील एका गावात सार्वजनिक ठिकाणी ‘स्मार्टफोन’च्या वापरावर प्रतिबंध घालण्याकडे लोकांचा कल !

मतदानात ५४ टक्के लोकांनी केले समर्थन !

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समधील गाव ‘सीन पोर्ट’ने स्मार्टफोनच्या व्यसनापासून मक्ती मिळण्यासाठी विशेष प्रयत्न चालवल्याचे समोर आले आहे. येथे सार्वजनिक ठिकाणी स्मार्टफोनवर निर्बंध घालण्यासाठी मतदान घेण्यात आले. आश्‍चर्य म्हणजे या मतदानात ५४ टक्के लोकांनी स्मार्टफोनवर निर्बंध घालण्याच्या बाजूने मतदान केले. एवढेच नव्हे, तर गावातील दुकानदारांनाही, ‘तुमच्याकडे येणार्‍या लोकांना भ्रमणभाषचा वापर अल्प करण्यासाठी प्रेरित करा आणि दुकानाबाहेर निर्बंधांचे ‘स्टिकर’ लावा’, अशी विनंती करण्यात आली.

सौजन्य : वनइंडिया न्यूज 

१. एवढेच नव्हे, तर फ्रान्समध्ये प्रथमच स्मार्टफोनच्या वापरावर स्थानिक प्रशासनाद्वारे लेखी आदेशही जारी केला जाईल. असे असले, तरी राष्ट्रीय स्तरावर कायदा नसल्यामुळे दोषींवर कोणतीही कारवाई करता येणार नाही.

२. फ्रान्समध्ये स्मार्टफोन आणि ‘स्क्रीन टाईम’ (दिवसभरात किती वेळ भ्रमणभाषचा वापर केला) हे एक राजकीय सूत्र होत आहे. नुकतेच राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन म्हणाले होते की, आपण मुलांसाठी स्क्रीनचा सर्वोत्तम वापर निश्‍चित करण्यासाठी तज्ञांशी चर्चा करणार आहोत.

३. यासमवेत पालकांसाठी काही दिशादर्शक सूत्रे प्रसारित करण्यात आली आहेत. यांमध्ये त्यांच्या पाल्यांना झोपण्याच्या खोलीत भ्रमणभाषचा वापर करता येणार नाही. तसेच १५ वर्षे वय होईपर्यंत त्यांना भ्रमणभाष दिला जाणार नाही. अर्थात् मुलांकडून यास विरोधही केला जात आहे.

४. काही दिवसांपूर्वी युरोपातीलच अन्य एक देश आईसलँड येथे एका आस्थापनाने एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. स्पधर्कांना एक महिनाभर त्यांचा भ्रमणभाष वापरता येणार नाही, अशी ती स्पर्धा होती. याला ‘डिजिटल डिटॉक्स’ ही संज्ञा आहे. याचा अर्थ तुमच्याकडे असणार्‍या कोणत्याही डिजिटल उपकरणापासून तुम्ही स्वत:ला वेगळे ठेवणे होय.

संपादकीय भूमिका 

वैज्ञानिक उपकरणांच्या अतिरेकी आणि अनियंत्रित वापराचाच हा परिपाक आहे. विज्ञानामुळे समाजाचे मनोस्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे आता अशा प्रकारे मतदान घेणे आणि प्रतिबंध लादण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. हे प्रयत्नही तसे वरवरचेच असून संयमी आणि समाधानी जीवनासाठी अध्यात्माधारित वैज्ञानिक विकासच श्रेयस्कर आहे !