उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण !
आळंदी (जिल्हा पुणे) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील अनुमाने ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, ह.भ.प. मारोतीबाबा कुरेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील आदी उपस्थित होते. या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाशिक दौर्यावर असतांना वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह भजन साधना केली; त्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फडणवीस पुढे म्हणाले की, वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणार्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेतून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकांपर्यंत पोचवण्यात येतो. संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य केले जाते. अधिक विद्यार्थ्यांची सोय झाल्यास समाजप्रबोधनासाठी अधिक विद्यार्थी मिळणार असल्याने शासनाकडून संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात येईल.
बंकटस्वामी सदनात राज्यभरातील विद्यार्थ्यांची सोय !
सदरचे विद्यार्थी वसतीगृह २ मजली असून त्याचे एकूण क्षेत्रफळ ७७४.४० चौरस मीटर आहे. एकूण २० खोल्यांचे स्वच्छतागृहासह बांधकाम करण्यात आले आहे. या वसतीगृहासाठी शासनाने १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून तळ मजल्यावरील एकूण १० खोल्यांचे, तर संस्थेच्या निधीतून पहिल्या मजल्यावरील एकूण १० खोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. देवाची आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत राज्यभरातून ग्रामीण भागातील विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांची येथे निवासाची सोय झाली आहे.