Education Marathi Schools:मराठी शाळांमध्ये तज्ञांकडून दिले जाणार १८ कलांचे शिक्षण !

  • राज्यशासनाचा स्तुत्य निर्णय !

  • संगीत, गायन, नाट्य, वक्तृत्व आदींचा समावेश !

मुंबई – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच व्यक्तीमत्त्व विकास व्हावा, यासाठी मराठी शाळांमध्ये लोकप्रिय व्यक्तींकडून १८ कलांचे शिक्षण देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यामध्ये संगीत, गायन, नाट्य, वक्तृत्व, चित्रकला आदी कलांचा समावेश आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे शिक्षण चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

मराठी शाळांमध्ये १८ कलांचे शिक्षण

ते म्हणाले, ‘‘विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने थेट संवाद साधून संबंधित कलेची माहिती विद्यार्थ्यांना देणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यशासनाच्या ६५ सहस्र शाळांचा समावेश आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जाणार आहे. ‘विद्यार्थ्यांनी या कला किती आत्मसात केल्या आहेत ?’, याची चाचपणी घेण्यासाठी याविषयी स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व विकसित होण्यास साहाय्य होईल.

शनिवार विद्यार्थ्यांसाठी आनंददायी करणार !

सोमवार ते शुक्रवार या कालावधीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकवला जाईल; मात्र शनिवार विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असेल. शनिवार संगीत, कृषी, वाचन आदींसाठी राखीव ठेवण्यात येईल. आठवड्यातील हा एक दिवस विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असेल. याविषयीचा व्यवस्थित आराखडा शिक्षण विभागाकडून बनवण्यात येत आहे. कृषीविषयीचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात येणार आहे.

वेळेत पालट न करणार्‍या शाळांचा परवाना रहित केला जाईल !

राज्यशासनाने २ दिवसांपूर्वीच सकाळी ७ वाजताच्या शाळेची वेळ पालटून ९ वाजताची केली आहे. याविषयी माहिती देतांना दीपक केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने हा पालट करण्यात आला आहे. ज्या शाळा वेळेत पालट करणार नाहीत, त्यांना कायद्याचा बडगा दाखवावा लागेल. ३ वर्षांनी प्रत्येक खासगी शाळेला परवाना नूतनीकरणासाठी यावे लागते. वेळेत पालट न करणार्‍या शाळांचा परवाना रहित केला जाईल.