हत्या करणारा नोरोन्हा याने स्वतःलाही संपवले
मुंबई – माजी नगरसेवक आणि शिवसेना (ठाकरे गट)चे नेते अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारीला रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते सुपुत्र होते. त्यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस नोरोन्हा याने नंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मेहूल पारीख आणि रोहित साहू यांना कह्यात घेतले आहे. मॉरिस नोरोन्हा याच्या विरोधात लालचंद पाल यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
१. मॉरिस नोरोन्हा यानेच घोसाळकर यांना बोलावून ‘हळदीकुंकू आणि साड्यांचे वाटप करू’, असे सांगितले होते. नोरोन्हाच्या कार्यालयात घोसाळकर कार्यकर्त्यांसह गेले. त्या वेळी या कार्यक्रमाचे ‘फेसबुक’वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.
२. काही वेळाने गोळीबाराची घटना घडली. घोसाळकर यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले; पण त्यांचा मृत्यू झाला.
३. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घोसाळकरांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
हत्या करण्यामागील कारण
दीड वर्षापूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांचे मोठे भांडण झाले होते. मॉरिसवर बलात्कार आणि विनयभंग असे गुन्हे नोंद झाल्याने त्याला ५ मास कारागृहात जावे लागले होते; पण बलात्कारासारख्या खटल्यात अभिषेक घोसाळकर यांनी अडकवल्याचा राग मॉरिसच्या मनात होता. त्याचा सूड घेण्याची भावना मॉरिसच्या मनात होती, असे मॉरिसच्या पत्नीने सांगितले. तो ‘अभिषेक घोसाळकरांना सोडणार नाही’, असे नेहमीच सांगायचा.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा नंगानाच अस्वस्थ करणारा ! – संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र सरकार होय. मंत्रालयात, तसेच नागपूरच्या विधानभवनात अनेक गुंड, गुन्हेगार, माफिया हे मुख्यमंत्री आणि बाळराजे यांना भेटतात. अनेक सरकारी कामे आणि कंत्राट गुंडांना दिली जातात. सरकारी पैशांनी गुंडगिरी वाढवली जात आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा नंगानाच पहायला मिळाला. तो अस्वस्थ करणारा आहे. इतिहासात असे कधी घडले नाही. गेले दीड वर्ष केवळ गुंडगिरीच्या बातम्या पहायला मिळत आहेत.