सांगली, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्य परिवहन महामंडळाची सांगलीतून कुंडल येथे जाणारी (एम्.एच्.१४ बी.टी. १०६६) या क्रमांकाची बस पाचवा मैल येथे आल्यावर नादुरुस्त झाल्याने ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता बंद पडली. बसमधील कुलंट (इंजिनला थंड करणारा पदार्थ) याला गळती लागली होती आणि ते सगळे रस्त्यावर सांडले होते. चालकाच्या सतर्कतेमुळे बस अपघातग्रस्त होण्यापासून वाचली. यातील सर्व प्रवाशांना तासगाव-कराड या बसमध्ये बसवून पुढे रवाना करण्यात आले.
या बसची अत्यंत दुरवस्था झाली होती आणि चालकाच्या ‘केबीन’मधील अनेक उपकरणे काम करत नव्हती, तसेच वायरी उघड्याच होत्या. प्रवाशांना बसण्यासाठीची बाके, खिडक्या यांची दुरवस्था झाली होती. यातील अनेक खिडक्या बंद होत नव्हत्या. सांगली-कुंडल या मार्गावर असणार्या सर्वच बसगाड्यांची दुरवस्था झाली असून वारंवार प्रवाशांना मागणी करूनही त्यांना चांगली बस देण्यात येत नाही. या संदर्भात बसचे चालक म्हणाले, ‘‘ही बस सकाळीच नादुरुस्त झाल्याने सांगली येथे दुरुस्ती विभागात दाखवण्यात आली होती. तेथे ‘दुरुस्ती झाली’, असे सांगितल्याने ही बस प्रवासी मार्गावर घेऊन आलो. प्रत्यक्षात यातील कुलंट रस्त्यावर पडत असल्याचे लक्षात आले. या बसचे आयुष्य आता संपल्यात जमा आहे.’’