वेदांचे रक्षण आणि प्रसार यांसाठी ‘वेदपाठशाळा’ !

डॉ. संजय मालपाणी

आळंदी (पुणे) – ज्या देशातून, भूमीतून वेदांचे उच्चाटन झाले, ते देश, भूमी नष्ट झालेली दिसून येते. देशाचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर वेदांचे उच्चारण, वेदांचे रक्षण आणि ते आचरणामध्ये कसे आणायचे ? याचे शिक्षण द्यायला हवे. वेदांचा प्रसार-प्रचार व्हायला हवा, या उदात्त हेतूने प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी ‘वेदपाठशाळा’ चालू करण्याचा निर्णय घेतला. गेली ३८ वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे चालू आहे. सध्या ८० अध्यापकांच्या माध्यमातून १ सहस्र ९२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशी माहिती गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.

देशभर प्रचार

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी याच हेतूने देशभर ‘वेदपाठशाळा’ चालू केल्या. या वेदशाळा जम्मू-काश्मीर, बंगाल, पूर्वोत्तर राज्यांमध्ये चालू करण्यात आल्या. आज ३८ ‘वेदपाठशाळां’च्या माध्यमातून पुरोहित घडवण्याचे कार्य चालू आहे.

संपूर्ण विनामूल्य वेदपाठशाळा ! 

देशभरांमध्ये या वेदपाठशाळांमध्ये विनामूल्य शिक्षण दिले जाते. या शाळेमध्ये पुरोहितांसाठी रहाणे, भोजन आणि शिक्षण यांची व्यवस्था केली जाते. सध्या या शाळांमधून २ सहस्र ५०० हून अधिक पुरोहित समाजाला समर्पित करण्यात आले आहेत.

महोत्सवामध्ये ८१ यज्ञांचे आयोजन 

अमृत महोत्सवानिमित ८१ यज्ञ होत आहेत. या यज्ञांमध्ये वैदिक (पुरोहित) हे सर्व ‘वेदपाठशाळे’तील आहेत.

दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन

आज आपल्याला वेदांचे दर्शन घ्यायचे म्हटले, तरी वेद सहजासहजी दिसून येत नाहीत. समाजातील लोकांना हे वेद कसे आहेत ? हे पहाण्यासाठी अनेक दुर्मिळ ग्रंथांचे वाचन आणि प्रदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, वाल्मिकी रामायण, ब्राह्मण ग्रंथ, वेदाङ्ग ग्रंथ असे ग्रंथप्रदर्शनात ठेवले आहेत.

५१ ग्रंथांचे पारायण

देशातील ३७ वेदपाठशाळांतील २ सहस्र २०० विद्यार्थी सोहळ्यासाठी आले आहेत. प्रतिदिन ६ घंटे विविध ग्रंथांचे वाचन (पारायण) करण्यात येत आहे. या वाचनामध्ये अनेक माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे.

या वेदपाठशाळेमध्ये वेदांचे शिक्षण घेण्याचा अभ्यासक्रम सिद्ध केला आहे. ५ वर्षांपुढील मुलांना प्रवेश देण्यात येतो. एका वेदाच्या अभ्यासक्रमासाठी १२ वर्षे अशी समयमर्यादा देण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वेद मुखोद्गत केले आहेत. या शिक्षणातून संस्कृतचे प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून समाजामध्ये प्रसार करता येतो.

ग्रंथांचे पारायण करतांना वेदपाठशाळेतील विद्यार्थी
ग्रंथांचे पारायण करतांना वेदपाठशाळेतील विद्यार्थी
ग्रंथांचे पारायण करतांना वेदपाठशाळेतील विद्यार्थी
होम करतांना वेदपाठशाळेतील पुरोहित
होम करतांना वेदपाठशाळेतील पुरोहित